बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत असून, दरमहा सरासरी १२ ते १५ प्रकरणे नोंदवली जात आहेत. यातील किमान चार प्रकरणे तर एकट्या बेळगाव शहरातील आहेत, ही चिंतेची बाब आहे.
२०२३ पासून जून २०२५ पर्यंत, म्हणजेच अडीच वर्षांच्या कालावधीत, एकूण ४३४ पॉक्सो प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यात २०२३ मध्ये १५७, २०२४ मध्ये १८० आणि जून २०२५ पर्यंत ९७ प्रकरणांचा समावेश आहे.
प्रकरणांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असली, तरी दोषींना शिक्षा होण्याचे प्रमाण मात्र अत्यंत कमी आहे. २०१५ ते २०२४ या कालावधीतील प्रकरणांमध्ये, २०२४ मध्ये केवळ १२ जणांना, तर २०२५ मध्ये ९ जणांना दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या बाबतीत बेळगाव जिल्हा कर्नाटक राज्यात सहाव्या क्रमांकावर आहे, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
वाढत्या प्रकरणांच्या तुलनेत गुन्हेगारांना शिक्षा होत नसल्याने, बालकांवरील लैंगिक अत्याचारांना आळा घालण्यात यंत्रणेला अपेक्षित यश येत नसल्याचे चित्र आहे.


