बेळगावच्या क्रिकेटपटूला 24 लाखांचा गंडा; उ. प्रदेशच्या दोघांना अटक

0
13
 belgaum

बेळगाव लाईव्ह :इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) संघ राजस्थान रॉयल्समध्ये स्थान मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन कर्नाटकातील 19 वर्षीय राज्यस्तरीय क्रिकेटपटूला 24 लाख रुपयांना फसवल्याच्या आरोपाखाली बेळगाव पोलिसांनी उत्तर प्रदेशातील दोघांना नुकतीच अटक केली आहे.

उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील सुलतान आणि दिवाकर अशी ओळख पटवण्यात आलेल्या वयाच्या विशितील आरोपींची नावे आहेत. बेळगाव जिल्ह्यातील चिंचणी (ता. चिक्कोडी) गावातील तरुण क्रिकेटपटू राकेश यदुरे या पीडित खेळाडूने दाखल केलेल्या तक्रारीवरून त्यांना अटक करण्यात आली. या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना बेळगावचे पोलिस अधीक्षक भीमाशंकर एस. गुळेद म्हणाले, “तपासातून असे दिसून आले आहे की सुलतानने यापूर्वीही अशाच पद्धतीने दोघांना फसवले होते, तर दिवाकर हा पहिल्यांदाच असा गुन्हा करत असल्याचे दिसून येते.” पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मे 2025 मध्ये हैदराबाद येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेत यदुरे याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधले होते. आपल्या कामगिरीचा अभिमान बाळगून त्याने इंस्टाग्रामवर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर कांही वेळातच त्याला राजस्थान रॉयल्सच्या प्रतिभा शोधणाऱ्या (टॅलेंट स्काउटिंग) चमुचा प्रतिनिधी असल्याचे भासवणाऱ्या एका आरोपीकडून फ्रेंड रिक्वेस्ट मिळाली. क्रिकेटपटू राकेश यदुरे याला डिसेंबर 2024 मध्ये एक मेसेज आला ज्यामध्ये आरोपीने दावा केला होता की त्याला आयपीएल संघासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. मेसेजमध्ये एका तथाकथित नोंदणी फॉर्मची लिंक होती आणि त्यात 2000 रुपयांचे प्रारंभिक पेमेंट करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर पुढील काही महिन्यांत म्हणजे 22 डिसेंबर 2024 ते 19 एप्रिल 2025 दरम्यान यदुरे याने मॅच फीच्या नावाने 40 हजार ते 8 लाख रुपयांपर्यंत असे एकूण 23 लाख 53 हजार रुपये टप्प्याटप्प्याने भरले.

अखेर क्रिकेटपटू राकेश यदुरे याला गेल्या 17 मे रोजी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बेळगाव सायबर, इकॉनॉमिक अँड नार्कोटिक्स (सीईएन) क्राइम पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. त्यावेळी कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे त्यांच्या वडीलांनी तक्रार दाखल करण्यात त्याला पाठिंबा दिला. पोलीस अधीक्षक गुळेद यांनी आरोपीनी फसवणुकीचे पैसे वैयक्तिक खर्च आणि चैनीसाठी वापरल्याचे नमूद करून “आम्ही नागरिकांना विशेषतः तरुणांना क्रीडा निवडी, नोकऱ्या किंवा रोख बक्षिसांसंदर्भातील ऑनलाइन आमिषाना बळी पडू नका. नेहमी अधिकृत माध्यमांद्वारे पडताळणी करा.” असे आवाहन करतो, अशी एक सार्वजनिक सूचना देखील त्यांनी जारी केली. सध्या उपरोक्त दोन्ही आरोपी पोलिस कोठडीत असून या घोटाळ्याला आणखी किती जण बळी पडले आहेत? याचा तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.