बेळगाव लाईव्ह :जंगली अस्वलाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना आज बुधवारी सकाळी खानापूर तालुक्यातील कणकुंबी येथे घडली.
अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नांव दशरथ वारंडेकर (वय 55) असे आहे. आज सकाळी शेतामध्ये काम करत असताना जंगली अस्वलाने दशरथ यांच्यावर हल्ला केला.
यावेळी अस्वलाशी झालेल्या झटापटीत दशरथ यांच्या तोंडाला गंभीर इजा झाली आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अस्वलाबद्दल माहिती घेतली.
अस्वलाच्या हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील दशरथ यांना रक्तबंबाळ अवस्थेत उपचारासाठी तातडीने बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. खानापूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.