बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर आणि परिसरातील मुस्लिम बांधवांनी आज शनिवारी बकरी ईद सण उत्साहात साजरा केला. या सणाच्या निमित्ताने शहरातील ईदगाह मैदानावर शेकडो मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम भक्तीभावाने पार पडला.
पैगंबर इब्राहिम यांच्या देवासाठी बलिदान देण्याच्या तयारीचे स्मरण करून देणारा ईद-उल-अधा अर्थात बकरी ईद सण आज शहर परिसरातील मुस्लिम बांधव भक्तिभावाने साजरा करत आहेत. दरवर्षीप्रमाणे या सणानिमित्त आज शनिवारी सकाळी शहरातील बेळगाव जिल्हा अंजुमन -ई -इस्लामच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात शहरातील शेकडो मुस्लिम बांधवांनी हजेरी लावून सामूहिक नमाज पठाण केले. नेहमीप्रमाणे मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी एकत्र आल्यामुळे ईदगाह मैदान परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
अंजुमन -ई -इस्लामचे प्रमुख आणि बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सार्वजनिक नमाज पठाण कार्यक्रमाच्या ठिकाणी जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पोलीस व अन्य खात्यांच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये विशेष करून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे वगैरे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षवेधी होती. त्यांनी आमदार असिफ शेठ यांच्यासह मुस्लिम समाजातील उपस्थित प्रमुख मंडळींना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी बेळगाव शहरातील मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कालपासून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. हा सण शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांसह होमगार्ड आपले कर्तव्य पार पाडत आहेत असे सांगून बकरी ईद सर्वांसाठी शुभदायी ठरो, अशा शुभेच्छा पोलीस आयुक्तांनी दिल्या.
आमदार असिफ सेठ यांनी देखील शहर परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, बकरी ईद याचा अर्थ बलिदान असा आहे मात्र बलिदान हे सर्वांच्या हितासाठी असले पाहिजे. म्हणूनच बकरी ईदचे महत्व लक्षात घेऊन सर्वांनी सुख शांतीने रहावे, एकमेकांशी प्रेम, सौहार्दाने राहावे.
तेंव्हा कोणालाही त्रास किंवा इजा होणार नाही याची काळजी घेत बकरी ईद सण साजरा करावा. विशेष करून हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या सणांमध्ये सामील होऊन सणाचा आनंद द्विगुणीत करावा. या पद्धतीने आपण आपला आणि देशाचा उत्कर्ष साधला पाहिजे आणि हे आपले कर्तव्य असून ते सर्वांनी पार पाडूया, असे विचार आमदार असिफ सेठ यांनी व्यक्त केले.