बेळगाव लाईव्ह: येत्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बकऱ्यांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी बेळगावमधील स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे घातले आहे.
सणाच्या काळात बकऱ्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होत असल्याने दलाल आणि व्यापाऱ्यांकडून अवाजवी दर आकारले जातात, ज्यामुळे सामान्य नागरिकांना कुर्बानीसाठी बकरे खरेदी करणे कठीण होते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मागील काही वर्षांपासून ईदपूर्वीच्या दिवसांमध्ये बकऱ्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढतात, असे निदर्शनास आले आहे. यामुळे सामान्य लोकांना कुर्बानीसाठी बकरी घेणे आवाक्याबाहेर जाते. वाढत्या मागणीचा फायदा घेऊन अनेक दलाल आणि व्यापारी अवाजवी नफा कमवतात, ज्यामुळे ग्राहकांवर आर्थिक ताण येतो आणि अनावश्यक व्यापार पद्धतींना प्रोत्साहन मिळते.

यावर उपाय म्हणून, ईदच्या काळात बकऱ्यांची विक्री योग्य आणि सामान्य दराने व्हावी यासाठी त्यांनी हस्तक्षेप करावा; यासाठी वजन आणि जातीनुसार योग्य किंमत मर्यादा निश्चित करावी, बाजारातील किमतींवर लक्ष ठेवण्यासाठी एका देखरेख समितीची नियुक्ती करावी, स्थानिक अधिकाऱ्यांनी नियमितपणे जास्त दर आकारले जात आहेत का, याची तपासणी करावी, आणि शक्य असल्यास, शासनाने मान्यताप्राप्त विशेष विक्री केंद्रे उभारणे यासारख्या उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.
या उपाययोजनांमुळे सणाच्या काळात जातीय सलोखा, आर्थिक संतुलन आणि सार्वजनिक समाधान राखण्यास मदत होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने अनुकूल कार्यवाही करावी, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.


