बेळगाव लाईव्ह : भेटी लागे जीवा सावळा श्रीरंग.. दरवर्षी बेळगाव सह सीमा भागातून हजारो वारकरी आषाढी एकादशीसाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला वारीत सहभागी होण्यासाठी जात असतात. तसेच अनेक वारकरीविठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी आसुसलेले आहेत.
बेळगाव आणि परिसरातूनही हजारोंच्या संख्येने वारकरी यावर्षीच्या वारीत सहभागी होत आहेत. आज रविवारी वडगाव राजवाडा कंपाउंड श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथून शेकडो हरीभक्त पंढरपूर मार्गे आळंदीला वारीत सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत.
आषाढी वारीत आतापर्यंत 7 प्रमुख पालख्यांसमवेत वारकरी पंढरपूरला पायी चालत येतात. यंदाच्या वारीत श्री संत एकनाथ महाराज संस्थान पैठण, श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान, त्र्यंबकेश्वर, श्री चांगावटेश्वर देवस्थान, सासवड, श्री संत सोपानदेव महाराज संस्थान, सासवड, श्री संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर, श्री विठ्ठल रुक्माई संस्थान, कोंडण्यपूर, श्री संत तुकाराम महाराज संस्थान,देहू, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी, श्री संत नामदेव महाराज संस्थान, पंढरपूर, श्री संत निळोबाराय संस्थान, पिंपळनेर या पालख्या आषाढी वारीसाठी येत आहेत.

वडगाव श्री संत ज्ञानेश्वर वारकरी मंडळाच्या वतीने गेली २६ वर्षे पायी वारीत सहभागी होत आहेत.यावर्षीच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी असंख्य लोकांमध्ये उत्सुकता होती. बुधवार दिनांक १८ रोजी देहू येथून तुकाराम महाराजांच्या तर गुरुवार दिनांक १९ रोजी आळंदी येथून श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव परिसरातील वारकरी पायी वारीत सहभागी होण्यासाठी विविध ठिकाणाहून रवाना होत आहेत.
आज सकाळी वडगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर मंदिरात उपस्थित वारकऱ्यांनी पूजा आरती केली. वडगाव ची ग्रामदेवता श्री मंगाई येथे देवीचे पूजन करण्यात आले. ह-भ-प शशिकांत धामणेकर आणि ह.भ.प. मंगेश नागोजी चे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव परिसरातील ६० हून अधिक वारकरी आज बेळगावहून पंढरपूर मार्गे आळंदी कडे पायी वारीत सहभागी होण्यासाठी हरी नामाच्या गजरासह रवाना झाले आहेत. आळंदी येथे मुक्काम करून श्री संत ज्ञानेश्वर पालखी समवेत सदर वारकरी पंढरपूर कडे पायी वारीने प्रस्थान करणार आहेत.