बेळगाव लाईव्ह : कन्नड ही स्वतंत्र सार्वभौम भाषा असताना, तामिळ भाषेतूनच कन्नड भाषेचा जन्म झाला असे वक्तव्य करणारे सुप्रसिद्ध तमिळ अभिनेते कमल हसन यांच्या छायाचित्रासह तमिळ चित्रपट आणि टीव्हीवरील तमिळ वाहिन्यांच्या प्रदर्शनावर कर्नाटकात तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी कित्तूर कर्नाटक सेनेने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे.
कित्तूर कर्नाटक सेनेचे राज्याध्यक्ष महादेव तळवार यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. प्रमेय अभिनेते कमल हसन यांनी एका कार्यक्रमात कोणताही पुरावा नसताना कन्नड भाषेचा तमिळ भाषेतून जन्म झाला आहे असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
हे वक्तव्य करून त्यांनी संपूर्ण कर्नाटक आणि कन्नडीगांचा अपमान केला आहे. आपल्या उद्धट वक्तव्याद्वारे कमल हसन यांनी कन्नडीगांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही. एक ज्येष्ठ अनुभवी अभिनेते असून देखील कमल हसन यांनी असे वक्तव्य करणे त्यांना शोभा देत नाही. तेव्हा त्यांनी एक तर सबळ पुराव्यानेशी आपले वक्तव्य खरे आहे हे सिद्ध करावे अथवा कर्नाटकातील समस्त कन्नडीगांची जाहीर माफी मागावी.

जोपर्यंत ते माफी मागत नाहीत तोपर्यंत कमल हसन यांच्या छायाचित्रासह तमिळ चित्रपट, टीव्हीवरील तमिळ धारावाहिक आणि तमिळ वाहिन्यांच्या प्रदर्शनावर कर्नाटकात तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
यावेळी प्रसिद्ध माध्यमांशी बोलताना राज्याध्यक्ष महादेव तळवार यांनी आपल्या संघटनेच्या मागणीबद्दल थोडक्यात माहिती दिली. तसेच मागणीची पूर्तता न झाल्यास छेडण्यात येणाऱ्या उग्र आंदोलनास सरकार जबाबदार राहील, असा इशारा दिला. निवेदन सादर करतेवेळी कित्तूर कर्नाटक सेनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


