ग्रामीण पोलिसांचा जुगारी अड्ड्यावर छापा; 12 जण ताब्यात :बेळगाव लाईव्ह :बेळगाव ग्रामीण पोलिसांनी नंदीहळ्ळी (ता. जि. बेळगाव) येथील शेतामध्ये सुरू असलेल्या एका जुगारी अड्ड्यावर छापा टाकून 12 जणांना ताब्यात घेण्याबरोबरच त्यांच्या जवळील रोख 15 हजार 90 रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे गोविंद परशुराम चौगुले, सुरज मष्णू तोपकर, मारुती पांडू सुतार, भरत सुधाकर पाटील, शिवाजी पांडू सुतार, संतोष अशोक सुतार, यल्लाप्पा परशुराम राघोजी, जोतिबा मोनाप्पा तोपकर, सातेरी परशुराम सुतार, किरण लक्ष्मण तळवार, परशुराम पांडू सुतार आणि कलाप्पा नागेंद्र तोपकर (सर्व रा. नंदीहळ्ळी) अशी आहेत. नंदीहळ्ळी येथील एका शेतामध्ये अंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच गेल्या शनिवारी सायंकाळी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी त्या ठिकाणी अचानक छापा टाकून उपरोक्त 12 जणांना अटक केली. तसेच त्यांच्याकडील जुगाराचे साहित्य व रोख 15090 रुपये जप्त केले. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कर्नाटक पोलीस कायदा कलम 87 खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंग्राळी -शाहूनगर रस्त्यावर 3.5 किलो गांजा जप्त, एकाला अटक
कंग्राळी बि.के. गावापासून शाहूनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर गांजा विक्री करणाऱ्या एका इसमाला बेळगाव शहर सीसीबी पोलिसांनी अटक करून त्याच्याकडील 94 हजार 900 रुपये किमतीचा सुमारे 3.5 किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव मनोहर उर्फ बाळू गजानन हुद्दार (रा. कलमेश्वरनगर, कंग्राळी बि.के., ता.जि. बेळगाव) असे आहे. कंग्राळी बि.के. गावाकडून शाहूनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक व्यक्ती अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती मिळताच बेळगाव शहर सीसीबी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कुंभार यांनी आपल्या सहकाऱ्यांसमोर धाड टाकून आरोपीला ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे त्याच्या जवळील 88,700 रुपये किमतीचा 3.468 किलो गांजा आणि रोख 3,700 रुपये जप्त केले. या पद्धतीने एकूण 94,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
सुभाषनगर येथे हेरॉईन विक्री करणारे 5 जण गजाआड
सुभाषनगर, प्रियांका रेसिडेन्सी जवळ सार्वजनिक ठिकाणी हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या महाराष्ट्रातील तिघा जणांसह एकूण 5 युवकांना मार्केट पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडील 30 हजार रुपये किमतीचे 30 ग्रॅम हेरॉईन जप्त केले.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे रेहान मोहम्मदगौस रोटीवाले (रा. आंबेडकरनगर, सदाशिवनगर बेळगाव), गणेशकुमार अनिल नागणे (रा. खोजेवाडी ता. पंढरपूर, महाराष्ट्र), सय्यदजानीश गुलाबअहमद अंगरशा (रा. बार्शी सोलापूर, सध्या रा सुभाषनगर बेळगाव), आदित्य राजू पडाळकर (रा. सांगली) आणि मोहम्मदहुसेन उर्फ सैबाज नूरहमद इनामदार (रा. रुक्मिणीनगर बेळगाव) अशी आहेत. हे सर्वजण सुभाषनगर येथील प्रियांका रेसिडेन्सी परिसरात सार्वजनिक ठिकाणी हिरोईनची विक्री करत असल्याची माहिती मिळताच मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावन्नावर यांनी छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतली. तसेच त्यांच्याकडे 30,000 रुपये किमतीचा 30 ग्रॅम हेरॉईन हा अंमली पदार्थ जप्त केला. आरोपीविरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यात पुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.


