बेळगाव लाईव्ह : ‘स्मार्ट सिटी’च्या नावाने शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागरिकांना सोयीऐवजी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा तीव्र संताप भोज गल्ली, शहापूर परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. 24 तास पाणीपुरवठ्याची घोषणा केवळ कागदावरच राहिली असून, खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बेळगावात अनेक ठिकाणी विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, यातील अनेक कामे रखडलेली, अर्धवट किंवा निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. विशेषतः शहापूरमधील भोज गल्लीत अनेक वर्षांपासून विविध ठिकाणी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे, परंतु ही कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. यामुळे नागरिकांना धुळीचा, खड्ड्यांचा आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
24 तास पाणीपुरवठा हे बेळगाव स्मार्ट सिटीचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट होते, परंतु शहापूरसह अनेक भागात अजूनही नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. खोदकाम केलेल्या पाईपलाईन फुटल्याने पाण्याची नासाडी होत असल्याचेही चित्र आहे.
विकासकामांऐवजी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खोदून ठेवलेले रस्ते वर्षानुवर्षे तसेच राहत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे आणि नागरिकांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे जनतेच्या पैशाचा अपव्यय होत असून, भविष्यातही या कामांमुळे समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्यंतरी स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे आरोप अनेक समाजसेवकांनी आणि नागरिकांनी केले होते. या आरोपांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली आमच्यासाठी विकासकामांपेक्षा समस्याच वाढल्या आहेत. रस्त्यांची चाळण झाली आहे, पाणी मिळत नाही आणि आरोग्यही धोक्यात आले आहे. जनतेच्या पैशाचा अपव्यय थांबवून ही रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत.
स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजातून जनतेच्या पाठीमागचा विकासकामांच्या नावाखाली होणारा ससेमिरा कधी थांबणार, असा संतप्त प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.



