बेळगाव लाईव्ह : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बेळगाव जिल्ह्यात प्लास्टिक प्रदूषणाचा नायनाट करण्यासाठी विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे. “जगातून प्लास्टिक प्रदूषणाचा अंत” या संकल्पनेखाली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने २२ मे रोजी घेतलेल्या व्हिडिओ परिषदेनंतर, २२ मे ते ५ जून या कालावधीत ‘प्लास्टिक प्रदूषण प्रतिबंधक’ अभियान राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या अंतर्गत, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये प्लास्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम आणि त्याच्या निर्मूलनासाठी विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
सीईओ शिंदे यांनी आवाहन केले की, या अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधी, तरुण, महिला बचतगटांचे सदस्य, ग्राम पाणी व स्वच्छता समितीचे सदस्य, स्वयंसेवक आणि गावातील प्रमुख नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. ‘स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)’ चा भाग असलेल्या या उपक्रमातून प्रत्येक गावाला प्लास्टिकमुक्त करण्याचा मानस आहे.

जिल्ह्यातील सर्व तालुके आणि ग्रामपंचायतींमध्ये खालीलप्रमाणे विशेष उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. यामध्ये एकल-वापर प्लास्टिकचा त्याग करण्याबाबत आणि त्याचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती, प्लास्टिक पिशव्या देणाऱ्या दुकाने, हॉटेल्स, बेकऱ्या आणि इतर व्यावसायिक केंद्रांची तपासणी, जलस्रोतांची स्वच्छता करणे आणि त्यांच्या आसपास प्लास्टिक कचरा साचणार नाही याची खात्री करणे,
नाल्यांची स्वच्छता करणे आणि नागरिकांना नाल्यांमध्ये कचरा किंवा प्लास्टिक न टाकण्याबद्दल जागरूक करणे, सीईओ राहुल शिंदे यांनी सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यात विशेष उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहेत.