बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरील रस्त्याच्या मधोमध गंभीर जखमी आणि अर्ध नग्नावस्थेत पडलेल्या एका मनोरुग्ण इसमाच्या मदतीला धावून जाताना सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची घटना आज घडली.
शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरील रस्त्याच्या मधोमध आज शुक्रवारी सकाळी एक मनोरुग्ण इसम अर्ध नग्न आणि गंभीर जखमी अवस्थेत असहाय्य पडून होता.
रस्त्यावर पडलेल्या त्या इसमाला अनेक दुचाकी अनावधानाने आदळून गेल्यामुळे गंभीर दुखापती होऊन जखमा उघड्या पडल्या होत्या. याबाबतची माहिती मिळताच, यंग बेळगाव फाउंडेशनचे सदस्य तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधला आणि रुग्णवाहिका बोलावली.

त्यानंतर जवळचे दुकानदार आणि रहिवाशांच्या मदतीने त्या इसमाला वैद्यकीय उपचारांसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरक्षितपणे हलवण्यात आले. एका स्थानिक दयाळू युवकाने त्याचे जुने कपडे त्या इसमाला देऊन बचाव कार्यात मदत केली. सदर बचाव कार्यात यंग बेळगाव फाउंडेशनचे अॅलन विजय मोरे, अवधूत तुडवेकर, संतोष येलगेट, फराज मुल्ला, पुंडलिक व्ही.बी., स्थानिक विक्रेते आणि इतर लोकांचा सहभाग होता.
यंग बेळगाव फाउंडेशन असुरक्षितांना मदत करण्यासाठी आणि गरजेच्या वेळी त्वरित प्रतिसाद देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे यावेळी अॅलन मोरे यांनी सांगितले.


