बेळगाव लाईव्ह :विनाकारण न्यायालयात दावा दाखल करणाऱ्यांना एक प्रकारे चपराक देताना एका खटल्यात मद्यावर 50 रुपये जादा दर आकारल्याचा आरोप करत दारू दुकानदारावर दाखल करण्यात आलेला 2 लाखांचा दावा बेळगाव जिल्हा ग्राहक न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
याबाबतची माहिती अशी की, टिळकवाडी येथील एका दारू विक्री दुकानातून गेल्या 4 डिसेंबर 2024 रोजी एका ग्राहकाने 10 बाटल्या मद्याची खरेदी केली होती.
सदर 180 एमएल मद्याच्या बाटलांची एमआरपी किंमत प्रत्येकी 150 रुपये असताना दुकानदाराने आपल्याकडून 155 रुपयांप्रमाणे दहा बाटल्यांचे 1550 रुपये घेतले. थोडक्यात प्रत्येक बाटली मागे 5 रुपये याप्रमाणे 10 बाटल्यांसाठी 50 रुपये अधिक घेतल्याचा आरोप करून संबंधित ग्राहकाने बेळगाव जिल्हा ग्राहक न्यायालयात 2 लाख रुपयांचा दावा दाखल केला होता. तसेच मद्य खरेदी केल्याची पावती देखील त्याने न्यायालयात सादर केली होती.
न्यायालयात दाखल झालेला हा दावा चर्चेचा विषय झाला होता. अतिरिक्त दर आकारल्याबद्दल ग्राहकाने कायदेशीर पातळीवर आवाज उठवल्याने इतर दारू विक्रेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. तथापि पावतीवर मद्य दुकानाचे नांव असले तरी ग्राहकाचे नांव नाही. त्यामुळे दावा दाखल करणारा ग्राहकच नव्हे, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील ॲड. सिद्धार्थराजे सावंत यांनी न्यायालयात केला.
तो युक्तिवाद ग्राह्य मानून ग्राहक न्यायालयाने सदरचा दावा रद्द करत फेटाळून लावला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्राहकांचे हक्क महत्त्वाचे असले तरी खोट्या आरोपांना स्थान नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


