बेळगाव लाईव्ह : जी वर्दी अंगात चढली.. की सळसळता रक्त उसळतो धमन्यातला जोश, अंगात संचारते वीरश्री आणि बलिदानासाठी सज्ज होतात या मातृभूमीची लेकरं या सगळ्या पार्श्वभूमीवर अख्ख कुटुंब सैन्याशी कसा जोडलं जातं आणि त्यांना कसा त्याचा अभिमान वाटतो याची एक रंजक चित्रमय कहानी म्हणजे.. बेंन्नाळकर कुटुंबीयाची यशोगाथा…
बेळगाव जिल्ह्यातील कंग्राळी खुर्द येथील बेन्नाळकर कुटुंबाने भारतीय संरक्षण दलातील आपल्या योगदानाने पुन्हा एकदा बेळगावचे नाव उंचावले आहे. सेवानिवृत्त कर्नल कृष्णा बेन्नाळकर, त्यांचे पुत्र मेजर अंशुल बेन्नाळकर (भारतीय सैन्यदल) आणि आता नुकतेच नौदलात सब लेफ्टनंट या पदावर अधिकारी म्हणून वंश बेन्नाळकर नियुक्त झालेआहेत.
जून महिन्यात ते केरळ येथे नौदल अधिकारी पदाचे प्रशिक्षण घेणार आहेत. नौदल अधिकारी झालेल्या वंश बेन्नाळकर यांच्या रूपाने, हे संपूर्ण कुटुंब देशसेवेसाठी कटिबद्ध आहे. हा क्षण केवळ बेन्नाळकर कुटुंबीयांसाठी किंवा कंग्राळी खुर्द गावासाठीच नव्हे, तर संपूर्ण बेळगावकरांसाठी अभिमानास्पद आहे. देशसेवेचे व्रत अंगिकारलेल्या या कुटुंबियांसमवेत ‘बेळगाव लाईव्ह’ ने केलेली खास बातचीत…

कर्नल कृष्णा बेन्नाळकर: अडचणींवर मात करत घडवले देशाचे रक्षक
41 वर्षांची निष्ठावान सेवा बजावलेले सेवानिवृत्त कर्नल कृष्णा बेन्नाळकर यांनी ‘बेळगाव लाईव्ह’ च्या वृत्तांकनाचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले, संरक्षण दलात काम करण्याची आपली आवड होती. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सैन्यदलात भरती होण्याचा निर्णय घेतला. अधिकारी पदावर सेवा बजावण्यासाठी आपले शिक्षण पूर्ण केले. सैन्यदलात भरती झाल्यापासून अनेक अनुभव घेतले. सुरुवातीला कमी शिक्षण असल्यामुळे अनेक अडचणी आल्या, पण त्या अडचणींवर मात करत शिक्षण पूर्ण केले. जेएनयू मधून शिक्षण घेऊन यूपीएससीपरीक्षा उत्तीर्ण केली आणि अधिकारी म्हणून रुजू झाले.
कर्नल बेन्नाळकर यांनी सांगितले की, आपल्या मुलांना अशा अडचणी येऊ नयेत यासाठी त्यांनी त्यांना योग्य शिक्षण दिले आणि शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. आपले गाव आणि प्रामुख्याने मराठा समाजातील मुलांना योग्य दिशा मिळावी हेच त्यांचे नेहमीचे ध्येय राहिले आहे. अलीकडच्या काळात मराठी भाषिक युवकांना योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्याचे दिसून येते, ही बाब दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. जर योग्य मार्गदर्शन मिळाले, तर तरुण अनेक खडतर टप्पे नक्कीच पार करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्यांनी शेकडो युवकांना सैन्यदलात भरती होण्यासाठी मार्गदर्शन केले असून, सैन्यदलासंदर्भात माहिती आणि सहकार्यही दिले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे आज त्यांची दोन्ही मुले मोठ्या पदांवर कार्यरत आहेत, याचा त्यांना अभिमान आहे. जून महिन्यात त्यांचे धाकटे पुत्र वंश बेन्नाळकर नौदल अधिकारीपदी रुजू होतील. तरुणांना मार्गदर्शन देण्यासाठी आपण सदैव तयार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्नल बेन्नाळकर यांनी बेळगावकरांना संदेश देताना सांगितले की, इंटरनेटच्या जमान्यात अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे, त्यामुळे प्रयत्नांपासून दूर जाऊ नये. बेळगावमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत आणि देशसेवेसाठी तयार असले पाहिजे.
भारतीय नौदलात सब लेफ्टनंट पदी नियुक्त झालेले वंश बेन्नाळकर यांनी आपला अनुभव ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना सांगितला. बारावीपासून त्यांनी अनेक स्पर्धात्मक परीक्षा दिल्या. पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले नाही, पण त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. बी.टेक पूर्ण केल्यानंतर त्यांना अनेक संधी उपलब्ध होत्या, पण त्यांनी नौदल विभाग निवडला. त्यांचे शिक्षण भारतातील विविध ठिकाणी झाले आहे, यामध्ये भीमपूर, नागालँड, राजस्थान, जम्मू येथील विविध आर्मी स्कूल तसेच बेळगावमधील के.एल.ई. इंटरनॅशनल स्कूल आणि हैदराबाद यांचा समावेश आहे. त्यांनी व्हीआयटी वेल्लोर येथून बी.टेक.ची पदवी घेतली. भारतीय सैन्यदलात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी वंश बेन्नाळकर यांनी संदेश दिला की, ध्येयापासून अजिबात विचलित होऊ नये. प्रत्येक गोष्टीची माहिती असणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवेश प्रक्रिया असतात, त्याची योग्य माहिती घेणे महत्त्वाचे आहे.

कर्नल कृष्णा बेन्नाळकर यांच्या पत्नी रुपाली बेन्नाळकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, हा त्यांच्यासाठी अविस्मरणीय आणि अभिमानाचा क्षण आहे. पतीसहित दोन्ही मुले भारतीय संरक्षण दलात सेवा देत आहेत. हे केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी म्हटले.
कर्नल कृष्णा बेन्नाळकर यांनी ग्रामीण भागातील युवकांना आवाहन केले की, त्यांनी आपले ध्येय निश्चित करण्याची गरज आहे. ध्येय निश्चित करून मेहनत घेतल्यास ग्रामीण भागातील मुलांनाही सैन्यदलात अधिकारी म्हणून यश मिळू शकते. बेळगाव ग्रामीण भागातील होतकरू मुलांना मार्गदर्शन करण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. कर्नल बेन्नाळकर यांचा हा संकल्प ग्रामीण युवकांसाठी एक नवा मार्ग दाखवणारा ठरू शकतो, हे निश्चित!
जगात महासत्ता बनण्याचा स्वप्न भारत बघतो त्यावेळी ती केवळ आर्थिक महासत्ता नसते तर सैन्याचं बळ ही तेवढच महत्त्वाचं असतं आणि हे सैन्याचे बळ मजबूत करणारे त्या त्या मनगटात हिम्मत भरणारे असतात ते बेन्नाळकर कुटुंबीयांसारखे वाघाच्या काळजाचे खरे नरवीर त्यांना बेळगाव लाईव्ह चा सलाम…