बेळगाव लाईव्ह :भरधाव कार गाडीने समोर चाललेल्या दुचाकीस्वाराला मागून धडक दिल्यामुळे आणि अपघातग्रस्त कारला अन्य एका दुचाकीने मागून ठोकल्याने घडलेल्या दुहेरी अपघातात एकूण 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना काकती गावातील मुत्त्यानट्टी हायवे ओव्हर ब्रिजवर काल दुपारी घडली.
अपघातातील जखमी दुचाकीस्वारांची नावे हनुमंत व्यंकाप्पा मुरेन्नावर (रा. दासरवाडी बेळगाव), संजयकुमार हिडदुग्गी आणि रेणुका हिडदुग्गी अशी आहेत. अपघातासंदर्भात परशुराम कल्लाप्पा मुरेन्नावर यांनी कारचालक सुभाष शंकर लमाणी (वय 53, रा. बाहेर गल्ली कंग्राळी बी.के.) याच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. सदर फिर्यादीनुसार, आपल्या मारुती स्विफ्ट कार गाडीतून (क्र. केए 22 एमबी 8185) होनगाकडून बेळगावकडे निघालेल्या आरोपी सुभाष लमानी याने काल दुपारी 1:45 वाजण्याच्या सुमारास काकती गावातील मुत्त्यानट्टी हायवे ओव्हर ब्रिजवर कारगाडी भरधाव वेगात निष्काळीजीपणे चालवून समोर बेळगावच्या दिशेने निघालेल्या हनुमंत मुरेन्नावर याच्या होंडा शाईन मोटरसायकलला (क्र. केए 22 केजे 5587) पाठीमागून धडक दिली. त्यामुळे मोटरसायकल वरून कोसळून हनुमंत याला गंभीर दुखापत झाली. समोर अचानक अपघात घडल्यामुळे कारच्या मागून होनगाकडून बेळगावच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या होंडा एक्टिवा (क्र. केए 22 एचके 7992) दुचाकीचे नियंत्रण सुटून तिने अपघातग्रस्त कारला धडक बसली. परिणामी दुचाकीवरील संजयकुमार हिडदुग्गी आणि त्यांच्या मागे बसलेली त्यांची पत्नी रेणुका हिडदुग्गी हे दोघे देखील गंभीर जखमी झाले. याप्रकरणी कागदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
मालवाहू वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी
महांतेशनगर ब्रिजनजीक मालवाहू वाहनाने धडक दिल्यामुळे एक मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना गेल्या बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली.
अपघातातील जखमी मोटरसायकल स्वाराचे नांव राजशेखर शिवणगौडा पाटील (रा. खुसरोनगर महांतेशनगर) असे आहे. महांतेशनगर येथून पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने निघालेल्या टाटा कंपनीच्या मालवाहू वाहनाने (क्र. केए 24 -2891) महांतेशनगर ब्रिज जवळ आपल्या मोटरसायकल वरून (क्र. 22 ईयु 8348) निघालेल्या राजशेखर पाटील यांना धडक दिली. सदर अपघातात पाटील यांना गंभीर दुखापत झाली असून याप्रकरणी बेळगाव उत्तर रहदारी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.




