बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारने बेळगाव जिल्ह्यातील हिंडलगा, बेनकनहळ्ळी आणि हिरेबागवाडी या तीन ग्रामपंचायतींना नगरपंचायतींमध्ये रूपांतरित करण्याचा प्रस्ताव जारी केला आहे. कर्नाटक नगरपालिका अधिनियम, १९६४ च्या कलम ३, ४, ९, ३४९, ३५१ आणि ३५५ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून कर्नाटकच्या राज्यपालांनी ही अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून लागू होईल.
या गावांना नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी काही विशिष्ट निकष विचारात घेण्यात आले आहेत. यामध्ये संबंधित क्षेत्राची लोकसंख्या १० हजारपेक्षा कमी आणि २० हजारपेक्षा जास्त नसावी. तसेच, लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर ४०० रहिवाशांपेक्षा कमी नसावी. याशिवाय, एकूण रोजगारापैकी बिगरशेती कामांमधील रोजगाराचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी नसावे.
बेळगाव जिल्ह्यातील हिंडलगा ग्रामपंचायतीला ‘हिंडलगा परिवर्तित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्याचा आणि ‘हिंडलगा नगर पंचायत’ म्हणून नामनिर्देशित करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावित नगरपंचायतीचे एकूण क्षेत्रफळ १४.८० चौरस किलोमीटर असेल. याच्या हद्दींमध्ये पूर्वेला बेळगाव महानगरपालिका, पश्चिमेला सुळगा (उ) गाव आणि मण्णूर गाव, दक्षिणेला बेनकनहळ्ळी गावची हद्द आणि उत्तरेला मण्णूर गाव व आंबेवाडी गावचा समावेश आहे.
हिंडलग्यासह बेळगाव जिल्ह्यातील बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीला ‘बेनकनहळ्ळी परिवर्तित क्षेत्र’ म्हणून घोषित करून ‘बेनकनहळ्ळी नगर पंचायत’ असे नाव देण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावित नगरपंचायतीचे एकूण क्षेत्रफळ १२.०० चौरस किलोमीटर असेल. याच्या हद्दींमध्ये पूर्वेला बेळगाव सीमा, पश्चिमेला सर्व्हे नं. २२५ कंठीराव केसरी मठपती स्पोर्ट्स, दक्षिणेला सर्व्हे नं. ११६ कळप्पा पुजारी यांची शेतजमीन आणि उत्तरेला सर्व्हे नं. १८० पाटील यांची शेतजमीन आणि सुळगा व हिंडलगा सीमा यांचा समावेश आहे.
तसेच बेळगाव जिल्ह्यातील हिरेबागवाडी ग्रामपंचायतीला ‘हिरेबागवाडी परिवर्तित क्षेत्र’ म्हणून घोषित करून ‘हिरेबागवाडी नगर पंचायत’ असे नाव देण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावित नगरपंचायतीचे एकूण क्षेत्रफळ २३.५३ चौरस किलोमीटर असेल. याच्या हद्दींमध्ये पूर्वेला हिरेबागवाडी गाव आणि बेनचिनमर्डी गावची हद्द, पश्चिमेला कणवी करवीनकोप्प गावची हद्द यांचा समावेश आहे.