बेळगाव लाईव्ह :बेळगाव ग्रामीण भागात बकऱ्या, मेंढ्या चोरीचे प्रकार घडत असताना आता यरमाळ रोडवरील एका शेतातील गोठ्यामध्ये बांधलेली सुमारे 1 लाख रुपये किमतीची उमदी बैलजोडी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे.
चोरीला गेलेली बैलजोडी ही बसवान गल्ली, शहापूर येथील शेतकरी मधु बाळकृष्ण मासेकर यांच्या मालकीची आहे. मधु मासेकर यांच्याकडे एक बैलजोडी आणि इतर 8 -10 जनावरे असून ते त्यांना यरमाळ रोडवर दोन गादे आतमध्ये असलेल्या आपल्या शेतातील बंद गोठ्यामध्ये ठेवतात.
त्यानुसार काल शुक्रवारी रात्री 10 वाजता नेहमीप्रमाणे आपली सर्व जनावरे गोठ्यामध्ये बांधून गोठा बंद करून मासेकर घरी परतले होते. त्यानंतर रात्री चोरट्यांनी गोठ्यात बांधलेले सुमारे 1 लाख रुपये किमतीचे दोन्ही बैल लांबवले.

आज सकाळी 6 वाजता मासेकर यांनी शेतातील गोठा उघडला असता आपले दोन बैल बांधलेल्या जागी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर आसपास सर्वत्र शोधाशोध करूनही ते न सापडल्यामुळे बैलांची चोरी झाली असावी या संशयातून मधु मासेकर यांनी वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
त्याचप्रमाणे सोबत दिलेल्या छायाचित्रातील बैल कोणाला आढळून आल्यास त्यांनी कृपया 9035126974 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही मासेकर यांनी केले आहे.


