व्यापार ठप्प – नागरीक, व्यापारी, पालक सगळेच त्रस्त!

0
27
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावातील वाहतूक व्यवस्थेचा कणा समजली जाणारी तानाजी गल्ली रेल्वेगेट ही 10 मार्चपासून नैऋत्य रेल्वेच्या निर्णयानुसार कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे. आता या ठिकाणी काँक्रिटची भिंत उभी केली जात असून, परिणामी संपूर्ण परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या निर्णयाचा नागरिक, विद्यार्थी, पालक, व्यापारी आणि वाहनचालक यांच्यावर मोठा विपरित परिणाम होत आहे.

तानाजी गल्ली रेल्वेगेट बंद झाल्यामुळे कपिलेश्वर उड्डाणपूल, भातकांडे स्कूल रोड, शहापूर, महात्मा फुले रोड, देशपांडे पेट्रोलपंप, कर्नाटक चौक, तसेच शनि मंदिर कॉर्नर येथे दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. खास करून शाळा सुरू व सुटण्याच्या वेळेत, पालक आणि विद्यार्थ्यांना अपार त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

कपिलेश्वर उड्डाणपुलाचा सर्व्हिस रोड अरुंद असल्याने, मोठ्या वाहनांच्या वाहतुकीस अडथळा होत असून अपघातांची शक्यता वाढली आहे. परिणामी महात्मा फुले रोड आधीच बंद असल्यामुळे, आता तानाजी गल्ली बंद झाल्याने पर्यायी मार्गांवर अतोनात ताण निर्माण झाला आहे. वाहने भातकांडे स्कूल रोड आणि शहापूरमार्गे मोठ्या संख्येने वळवली गेल्यामुळे नागरिक वैतागले आहेत. या कोंडीत शाळकरी मुले आणि त्यांच्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर लहान मुलांनी वाहतुकीतून मार्ग काढणे धोकादायक ठरत आहे. अपघाताची शक्यता लक्षात घेता, पालक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

 belgaum

तानाजी गल्ली आणि फुलबाग गल्लीतील रेल्वेगेटच्या बंदीमुळे या भागातील ऑटोमोबाईल आणि इतर व्यावसायिक दुकानदारांना जबरदस्त फटका बसला आहे. काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने विक्रीस काढली, तर काहींनी रिकामी करून भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. कपिलेश्वर उड्डाणपुलाखालील व्यापाऱ्यांप्रमाणेच आता तानाजी गल्लीतील व्यापाऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे.

सुरुवातीला तानाजी गल्ली रेल्वेगेटजवळ उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव होता, मात्र स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे तो रद्द करण्यात आला. त्याचवेळी रेल्वे प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले होते की, रेल्वेगेट बंद होणारच. त्यावेळी कुणी विरोध केला नाही, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर नागरिक आक्रमक झाले आहेत.

सध्या उभारण्यात येणाऱ्या भिंतीमुळे नागरिकांची खालून ये-जा करण्याची शेवटची शक्यताही बंद होणार आहे. त्यामुळे नागरिक आणि व्यापारी वर्ग रेल्वेगेटबाबत पुनर्विचार करून दुसरा समतोल पर्याय तात्काळ उपलब्ध करून द्यावा अशी एकमुखाने मागणी करताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.