बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगाव शहराच्या दक्षिणेकडे वसलेला अनगोळ हा भाग अलीकडेच चर्चेचा विषय ठरू लागला आहे. कारणही तसेच आहे, या भागातील दोन कन्यांनी अवघ्या एका महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये अनुक्रमे शहर व जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर क्रमांक पटकावत, आपला ठसा उमटवला आहे.
बारावीच्या वाणिज्य शाखेत तन्वी पाटील ही राज्यात तिसरी आली आणि त्यानंतर दहावीच्या परीक्षेत निधी कंग्राळकर हिने जिल्ह्यात दुसरा आणि शहर-तालुक्यात पहिला क्रमांक मिळविला. विशेष म्हणजे, या दोघीही अनगोळ भागातील आहेत. एका ठराविक वस्तीतील दोन विद्यार्थिनींनी अशा प्रकारचे यश मिळवणे हे नुसते योगायोग नसून, तो एक अभ्यासाचा पॅटर्न बनू पाहत आहे तो पॅटर्न म्हणजेच ‘अनगोळ पॅटर्न’.
अनगोळ ही वस्ती अर्धनगरी आणि ग्रामीण संस्कृतीच्या मिलाफाची ओळख निर्माण करत आहे. येथे बहुतांश जनता शेतमजूर, शेतकरी आणि मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतील आहे. जीवनशैली तुलनेत साधी, आणि सुविधांची वानवा असणारी आहे. तरीही अशा ठिकाणी राहून विद्यार्थिनी राज्यभरात नाव कमावतात म्हणजेच त्यांच्या यशामागे केवळ शिक्षणाची आकांक्षा, घरातील पाठिंबा, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःची वृत्ती आहे.

आजच्या स्पर्धात्मक युगात बहुतेक पालक आपल्या मुलांना यशासाठी महागडे क्लासेस, आधुनिक सुविधा, इलेक्ट्रॉनिक साधनं, तंत्रज्ञान देतात. पण अनगोळमधील विद्यार्थी यशस्वी ठरतात यामागे केवळ एकच गोष्ट आहे : जिद्द आणि नियोजनबद्ध अभ्यास. या विद्यार्थिनींना उच्च दर्जाचे क्लासेस नव्हते, विशेष कोचिंग नव्हते, पण त्यांनी ‘स्व-अध्ययन, निरंतरता, आणि फोकस’ या तत्त्वांचा अवलंब केला. त्यांच्या अभ्यासाचा एक ठराविक वेळ, ठिकाण, आणि पद्धत होती. आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांनी अभ्यासाला एक दैनंदिन शिस्त म्हणून स्वीकारले. हाच ‘अनगोळ पॅटर्न’ इतरांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो.
तन्वी आणि निधी या दोघींच्या घरात वाढीव शिक्षणासाठी आवश्यक सोयी नसल्या तरी त्यांच्या जिद्दीपुढे ते गौण ठरले. आर्थिक व सामाजिक मर्यादांमधून वाट काढून, त्यांनी शिक्षणाच्या जोरावर राज्य पातळीवर झेंडा फडकवला. त्यांचं यश हे केवळ गुणांमध्ये नाही, तर त्यांच्या संघर्षाच्या प्रवासात आहे. ‘बेळगाव लाईव्ह’ च्या माध्यमातुन या यशोगाथांना जनतेसमोर अनेकवेळा मांडण्यात आले..
आता ही जबाबदारी पुढे जाते, या पॅटर्नला बेळगावभर राबविण्याची. यासाठी कोणते क्लासेस, कोणती साधने, किती खर्च लागतो यापेक्षा कसा अभ्यास करायचा, कोणती शिस्त पाळायची, वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं यावर भर असायला हवा.
“वृत्ती यशस्वी बनवते, साधनं नव्हे!” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते, “शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही.” अनगोळमधील तन्वी आणि निधी यांनी हे दूध पिऊन गुरगुरण्याच्या पलीकडे जाऊन, आपल्या समाजासाठी प्रेरणा निर्माण केली आहे. आज त्यांचा पॅटर्न, त्यांची वृत्ती आणि यशाचे सूत्र सगळ्यांसाठी अभ्यासण्यासारखे ठरत आहे. आज गरज आहे ती, यशाचे महागडे मॉडेल नाही तर प्रामाणिक अभ्यासाची वृत्ती अंगीकारण्याची.

अनगोळचा पॅटर्न फक्त एक विशिष्ट भागापुरता न राहता, तो संपूर्ण बेळगाव जिल्ह्यासाठी, आणि राज्यासाठीही रोल मॉडेल ठरावा, अशी अपेक्षा आहे. यामुळे यशासाठी संधी नसते, ती निर्माण करावी लागते – हेच अनगोळच्या कन्यांनी करून दाखवले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
ही बातमी देखील वाचा
बारावी निकाल कॉमर्स विभागात गोगटे कॉलेजच्या बाजी;