बेळगाव लाईव्ह : 2025 मधील एसएसएलसी परीक्षा -1चा निकाल 66.14 टक्के इतका लागला असून बेळगाव जिल्ह्याच्या बैलहोंगल तालुक्यातील सरकारी संयुक्त पदवी पूर्व महाविद्यालय देवलापूरची विद्यार्थिनी रूपा चनगौडा पाटील हिने राज्यात संयुक्तरीत्या प्रथम क्रमांक मिळवला आहे. राज्यातील एकूण 22 विद्यार्थ्यांनी 625 पैकी 625 गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या (74 टक्के) जास्त असून मंगळूर शैक्षणिक जिल्ह्याने सर्वाधिक टक्केवारीसह (91.12 टक्के) राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे.
बेळगाव येथील सेंट जोसेफ शाळेची विद्यार्थिनी निधी नंदकुमार कंग्राळकर यांनी 625 पैकी 624 गुण घेत बेळगाव जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. बेळगाव अनगोळ येथे राहणारी निधी कंग्राळकर सेंट जोसेफ शाळेची विद्यार्थिनी आहे.
कर्नाटक शाळा परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्यावतीने शालेय शिक्षण मंत्र्यांनी आज शनिवारी सकाळी एसएसएलसी परीक्षा -1च्या निकालाची अधिकृत घोषणा केली असून दुपारी 12:30 वाजल्यानंतर शिक्षण खात्याच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध करण्यात आला आहे. निकालामध्ये मंगळूर शैक्षणिक जिल्हा मागोमाग उडपी (89.96 टक्के), कारवार (83.91 टक्के), शिमोगा (82.29 टक्के) आणि कोडगू (82.21 टक्के) या शैक्षणिक जिल्ह्यांनी अनुक्रमे दुसरे, तिसरे, चौथे व पाचवे स्थान मिळविले आहे. बेळगाव (62.16 टक्के) आणि चिक्कोडी (62.17 टक्के) शैक्षणिक जिल्ह्यांना अनुक्रमे 25 व 26 व्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. यंदाच्या या परीक्षेत मराठी माध्यमाचा निकाल 53.97 टक्के इतका लागला आहे. याखेरीज राज्यातील तब्बल 144 शाळांना निकालाचे खातेच उघडता आले नसून त्यांचा निकाल ‘शून्य’ टक्के लागला आहे.

राज्यातील 2025 मधील एसएसएलसी परीक्षा -1साठी एकूण 790890 बसले होते, त्यापैकी 523075 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे निकाल 66.14 टक्के इतका लागला आहे. राज्यातील 390311 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, त्यापैकी 226637 (58.03 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 400579 विद्यार्थिनींपैकी 296438 (74.00 टक्के) विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. या पद्धतीने उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. बेळगाव जिल्ह्याच्या बैलहोंगल तालुक्यातील सरकारी संयुक्त पदवी पूर्व महाविद्यालय देवलापूरची विद्यार्थिनी रूपा चनगौडा पाटील हिने 100 टक्के म्हणजे 625 पैकी 625 गुण मिळवत राज्यात संयुक्तरीत्या प्रथम क्रमांक मिळवला आहे. या एसएसएलसी परीक्षेचा राज्यातील शहरी भागाचा निकाल 67.05 टक्के, तर ग्रामीण भागाचा निकाल 65.47 टक्के इतका लागला आहे.
शाळांच्या प्रकारानुसार निकाल पाहता राज्यातील सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांचा निकाल अनुक्रमे 62.7 टक्के 58.97 टक्के व 75.59 टक्के इतका लागला आहे. सरकारी शाळांपैकी 329 शाळांचा निकाल 100 टक्के तर 6 शाळांचा निकाल ‘0’ टक्के लागला आहे. अनुदानित शाळांपैकी 53 शाळांचा निकाल 100 टक्के तर 30 शाळांचा निकाल ‘0’ टक्के, त्याचप्रमाणे विनाअनुदानित शाळांपैकी 539 शाळांचा निकाल 100 टक्के आणि 108 शाळांचा निकाल ‘0’ टक्के लागला आहे. एसएसएलसी परीक्षेला बसलेल्या 4553 भिन्न सक्षम विद्यार्थ्यांपैकी 2633 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांचा निकाल 57.83 टक्के इतका लागला आहे. राज्यातील विविध भाषा माध्यमांचा निकाल पुढील प्रमाणे आहे. कन्नड -57.61 टक्के, इंग्रजी -78.38 टक्के, उर्दू -46.46 टक्के, मराठी -53.97 टक्के, तेलगू -74.56 टक्के, तमिळ -37.88 टक्के, हिंदी -53.72 टक्के एकूण : 66.14 टक्के.