बेळगाव लाईव्ह :खानापूर मार्गावर उद्यमबाग येथील बेम्को सर्कल, मजगाव क्रॉस व फाउंड्री क्लस्टर क्रॉस येथे अलीकडे रहदारीची समस्या वाढत असून विशेष करून बेम्को सर्कल येथे सिग्नल अभावी सातत्याने वाहतुकीची कोंडी होऊन वाहनचानकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तेंव्हा पोलीस प्रशासनाने हा सिग्नल तात्काळ सुरू करावा आणि संबंधित सर्व ठिकाणी रहदारी पोलिसांची नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी उद्योजक व वाहनचालकांमधून होत आहे.
उद्यमबाग येथील दुपदरी बेळगाव -खानापूर मार्गावर अलीकडे रहदारीची समस्या वाढत असून विशेष करून दुभाजकाच्या वळणाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. या मार्गावर विशेष करून बेम्को सर्कल येथे सिग्नल बसवण्यात आला असला तरी तो कार्यान्वित नाही.
परिणामी या सर्कलच्या ठिकाणी दररोज सायंकाळी 5 ते 7 दरम्यान वाहनांची एकच गर्दी होऊन वाहतूक कोंडी होत असते. कांही काळ वाहतूक ठप्प झाल्यामुळे दोन्ही बाजूच्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागून तातडीच्या कामासाठी जाणाऱ्या वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

याची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस प्रशासनाने एक तर बेम्को सर्कल येथील सिग्नल तात्काळ दुरुस्त करून सुरू करावा अथवा या ठिकाणी दिवसभर नाही तरी किमान सायंकाळच्या वेळी रहदारी पोलिसाची नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी उद्योजक व वाहनचालकांमधून केली जात आहे.
बेळगाव -खानापूर दुपदरी रस्त्यावर बेम्को सर्कल पासून दोन्ही बाजूला कांही अंतरावर असलेल्या मजगाव क्रॉस आणि फाउंड्री क्लस्टर क्रॉस या ठिकाणी देखील वाहन चालकांना सायंकाळी 5 ते 7 या वेळेत वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. उपरोक्त सर्व ठिकाणी कांही वाहने वळण घेऊन दुसऱ्या बाजूला जाण्याची घाई करत असल्यामुळे सदर वाहतूक कोंडी होण्याबरोबरच काही वेळेला अपघाताचे प्रसंगही घडत आहेत. तेंव्हा या क्रॉसच्या ठिकाणी देखील रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी केली जात आहे.
एकंदर बेळगाव शहरात अलीकडे वरचेवर होणारी ट्रॅफिक जामची समस्या आता बेळगाव -खानापूर रोडवर देखील उद्भवू लागली आहे. या पद्धतीने एकीकडे वाहनचालकांना वाहतूक कोंडीच्या समस्येने ग्रासलेले असताना त्याकडेही लक्ष देण्याची गरज असताना शहरातील ठराविक चौकांमध्ये चार-पाच रहदारी पोलीस एकाच ठिकाणी थांबून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांकडून दंड वसुली करण्यात व्यस्त असल्याचे पहावयास मिळते. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केलीच पाहिजे. परंतु त्याबरोबरच बेळगावच्या रहदारी पोलिसांनी वाहतूक कोंडीच्या समस्येकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.


