बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील तानाजी गल्ली येथील रेल्वे गेटच्या बंद करण्यात आलेल्या रस्त्याच्या ठिकाणी किमान फूट ओव्हर ब्रिज उभारावा या मागणीसाठी स्थानिकांनी गेटच्या ठिकाणी आज सकाळी रेल्वे अडवण्याचा प्रयत्न करून आंदोलन केले.
शहरातील तानाजी गल्ली रेल्वे गेटच्या ठिकाणी ओव्हर ब्रिज बांधण्याच्या योजनेस स्थानिकांचा तीव्र विरोध झाल्यामुळे योजना रद्द करण्यात आली. त्याचबरोबर सदर रेल्वे गेटचा रस्ता दोन्ही बाजूला भिंत उभारून बंद करण्यात आला आहे.
बेळगाव दक्षिण मतदार संघाला उत्तर मतदार संघाशी जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांपैकी एक असणाऱ्या हा रस्ता बंद झाल्यामुळे नागरिकांची विशेष करून स्थानिक रहिवाशांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे.


ही गैरसोय दूर करण्यासाठी या ठिकाणी फुटब्रिज उभारण्याची जोरदार मागणी केली जात आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी तानाजी गल्ली परिसरातील लोकांनी आज सकाळी आंदोलन छेडून प्रशासनाचे लक्ष वेधले. मिळालेल्या माहितीनुसार यावेळी रेल्वे अडवण्याचा देखील प्रयत्न झाला.
यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना बोलताना प्रभाग क्र. 15 च्या नगरसेविका नेत्रावती भागवत यांचे पती व सामाजिक कार्यकर्ते विनोद भागवत यांनी तानाजी गल्ली रेल्वे गेट येथील नियोजित रेल्वे ओव्हर ब्रिजला कशाप्रकारे विरोध दर्शवून तो प्रकल्प रद्द केला गेला. मात्र त्यानंतर या ठिकाणी रेल्वे खात्याने भिंत बांधून रेल्वे गेटचा रस्ता बंद केल्यामुळे उद्भवलेली समस्या आणि त्यासाठी अत्यावश्यक आवश्यक असलेला फूट ओव्हर ब्रिज याबद्दल माहिती दिली.