बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील पाटील गल्ली येथील पुरातन श्री शनि मंदिर येथे आज मंगळवारी श्री शनि जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाद्वारे भक्तीभावाने साजरी करण्यात आली.
अत्यंत जागृत मानल्या जाणाऱ्या सदर शनी मंदिरामध्ये श्री शनि जयंती निमित्त आज पहाटेपासूनच देव दर्शनासाठी भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. मंदिरामध्ये सकाळी सूर्योदयाच्या वेळी श्री शनि महाराजांचा जन्मकाळ साजरा करण्यात आला.
त्यानंतर श्री शनि देवाचा रुद्राभिषेक, पंचामृत अभिषेक आणि भक्तांकडून तैला अभिषेकाचा कार्यक्रम झाला. याखेरीज श्री शनी शांती, तीळ होम, श्री शनि रुद्र होम, श्री शनि जप वगैरे धार्मिक विधी मोठ्या भक्तीभावाने पार पडले. संपूर्ण जगाच्या कल्याणार्थ श्री शनि होम आणि विशेष पूजा देखील पार पडली. या विधीनंतर देवाची अलंकार सेवा आणि महाआरती करून महानैवेद्य दाखवण्यात आला. याप्रसंगी भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. सदर प्राचीन शनी मंदिरात आज श्री शनी जयंती निमित्त देवदर्शनासाठी दिवसभर भक्तांची रांग लागली होती.
याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना श्री शनी मंदिराचे मालक व पुरोहित विलास अध्यापक यांनी श्री शनि जयंती निमित्त आयोजित केलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांची माहिती दिली. दक्षिण भारतात आमचे हे श्री शनी मंदिर प्रख्यात असून फक्त बेळगावच नव्हे तर कर्नाटकसह महाराष्ट्र व गोव्यातील भाविक देवदर्शनासाठी या ठिकाणी येत असतात या मंदिरातील श्री शनि महाराजांच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीच्या मूर्तीची देशातील कोणत्याही मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आलेली नाही.

या मूर्तीला वीर स्थितीतील मूर्ती असे म्हंटले जाते, ज्या वरील सुबक कोरीव काम हे दुर्मिळ मानले जाते. बेळगावकरांसाठी गर्वाची बाब म्हणजे खुद्द उज्जैनच्या पुजाऱ्यांनी ही मूर्ती पाहून या पद्धतीची श्री शनि देवाची मूर्ती देशात अन्यत्र कुठेही नसल्याचे सांगितले आहे. आमचे हे शनि देवस्थान अत्यंत जागृत म्हणून ओळखले जाते.
या ठिकाणी नवस करणाऱ्यांना श्री शनि महाराज हमखास फळ देतात अशी भक्तांची धारण आहे असे सांगून संपूर्ण जगात शांतता तसेच सुख-समृद्धी नांदावी लोकांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी आम्ही आज विशेष पूजा केली आहे त्याचप्रमाणे देशाच्या सीमेवर शत्रूशी समर्थपणे चार हात करणाऱ्या आपल्या सैन्याचे मनोबल कायम मजबूत राहो, अशी प्रार्थना देखील आम्ही श्री शनेश्वर चरणी केली आहे, अशी माहिती विलास अध्यापक यांनी दिली. यावेळी संजीव अध्यापक यांनी सुमारे 200 वर्ष जुन्या श्री शनि मंदिराबाबत माहिती देऊन अध्यापक घराण्याची पाचवी पिढी या मंदिराचे पौराहित्य करत असल्याचे सांगितले.