बेळगाव लाईव्ह:शहरातील शाहूनगर येथील एका रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण केले जात असून या प्रकाराला तात्काळ आळा घालण्यात यावा आणि केलेले अतिक्रमण हटवण्यात यावे, अशी मागणी शाहूनगर येथील रहिवाशांनी खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे केली आहे.
शाहूनगर येथील रहिवाशांच्या शिष्टमंडळाने आज शुक्रवारी सकाळी काडा मधील खासदारांच्या कार्यालयामध्ये त्यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन त्यांना सादर केले.
शाहूनगर येथे सरकारी नकाशा नुसार असलेल्या एका रस्त्यावर काही लोकांकडून अतिक्रमण केले जात आहे. सदर सर्व्हे नं. 48/1 बी येथे असलेल्या सदर रस्त्याच्या ठिकाणी सध्या एका मोठ्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे.
या इमारतीचा मालक स्थानिकांचा विरोध डावलून थेट रस्त्याची जागा बळकावून बांधकाम करत आहे. या संदर्भात खासदार शेट्टर यांना कागदपत्रं व नकाशा दाखवून सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच अतिक्रमणाच्या या गैरप्रकाराला आळा घालून केलेले अतिक्रमण हटवून रस्ता सार्वजनिकांसाठी खुला ठेवावा, अशी विनंती करण्यात आली.
सदर समस्या जाणून घेऊन आगामी बैठकीत ती मांडून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन खासदार शेट्टर यांनी दिले. निवेदन सादर करतेवेळी प्रा. दिवेकर, सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी सुनील आपटेकर, बागी वगैरे शाहूनगर येथील रहिवासी उपस्थित होते.





