बेळगाव लाईव्ह :समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन भरधाव कार गाड्यांची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार झाल्याची घटना आज सोमवारी बेळगाव जिल्ह्यातील चिक्कबागेवाडी (ता. बैलहोंगल) नजीक घडली.
बेळगावला जोडणाऱ्या महामार्गावर बेळगावहून बैलहोंगल मार्गे जाणाऱ्या किया कारचा चालक ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना विरुद्ध दिशेने बैलहोंगलहून हिरेबागेवाडीकडे येणाऱ्या अल्टो कारला त्याने जोराची धडक दिली.
ही धडक इतकी जबरदस्त होती की अल्टो कार मधील आयुब नामक व्यक्ती त्याची पत्नी व त्यांचे मूल असे तिघेजण जागीच ठार झाले.
मयत पती-पत्नीच्या दुसऱ्या मुलाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. कीया कार गाडीतील दोघा जखमींना बेळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या अपघातातील मृतांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात धाडण्यात आले आहेत.
राष्ट्रीय महामार्गावर दोन वेगवेगळे अपघात : एक ठार, एक जखमी
बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर व परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटना घडल्या असून, एका अपघातात बाईकस्वाराचा मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या घटनेत एक ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये वाहनचालकांनी केलेल्या निष्काळजी व वेगाच्या भरात वाहन चालविल्याचे आढळून आले असून, पोलिसांनी भारतीय दंड संहिता व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हे नोंदवले आहेत.
पहिली घटना ६ मे रोजी पहाटे १२.३० वाजता हलगा गावाच्या हद्दीत, सुवर्ण सौधजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली. मारुती परशुराम नाईक (रा. नावगे) यांनी चालवलेले गुड्स टँकर (जिआ-०५/टी-२३७३) कोणत्याही सूचनाफलकांशिवाय रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आले होते. यामुळे वाहनांच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला. त्या वेळी विजय राजप्पा बैलपत्तार (रा. हुबळी) हे केए-२२/एचएन-५०२० क्रमांकाच्या दुचाकीवरून अत्यंत वेगात जात होते. टँकरच्या मागे अचानक आदळल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात टँकर चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेनंतर पोलिसांनी कलम २८१, १२५(अ), १०६(१) व २८५ भादंवि अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दुसरी घटना ४ मे रोजी खानापूर रोडवरील नागशांती शोरूमजवळ घडली असून यात प्रितेश मालकाचे (रा. संभाजी गल्ली, बेळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राजेश रमाकांत शानभाग (रा. टिळकवाडी) यांनी चालवलेली कार (केए-२०/एमबी-४७७१) अतिशय वेगात व निष्काळजीपणे चालवली जात होती. या दरम्यान, सायकलवरून जात असलेले दीपक परशराम मालकाचे (वय ६७) यांच्या सायकलला कारच्या डाव्या मिररने जोरदार धडक बसली. या धडकेत दीपक मालकाचे गंभीर जखमी झाले असून त्यांना चेहरा, दोन्ही हात व उजव्या पायाला दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे, अपघात घडवल्यानंतर चालकाने कोणतीही माहिती न देता कार घेऊन घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकारावरून पोलिसांनी त्याच्यावर भादंवि कलम २८१, १२५(ब), १३४(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवून सखोल तपास सुरू केला आहे.


