बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील रामलिंग खिंड गल्लीत रस्ता रुंदीकरण करण्यात आलं, पण नागरिकांना वाहतुकीचा दिलासा मिळालेला नाही. या भागात पार्किंगचा बेसुमार प्रश्न, व्यावसायिकांची अडचण, आणि वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे समस्यांमध्ये भरच पडत आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेली ही गल्ली काही वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरणामुळे चर्चेत होती. स्थानिक प्रशासनाने वाहतूक सुकर होण्यासाठी रस्त्याचा विस्तार केला, अनेक जुनी घरे आणि व्यावसायिक आस्थापने बाजूला हटवली. मात्र, प्रत्यक्षात रस्ता वाहतुकीसाठी नव्हे, तर पार्किंगसाठी वापरला जातो, ही वस्तुस्थिती नागरिकांसाठी त्रासदायक ठरते आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी चारचाकी व दुचाकी वाहनांचे पार्किंग होत असल्याने येथील वाहतुकीच्या समस्येत अधिक भर पडत आहे. विशेषतः परगावाहून येणारे लोक येथे चारचाकी गाड्या लावून बेळगाव बाजारात जातात.
त्यामुळे गल्लीतील रहदारी ठप्प होते. व्यावसायिकांनी रस्ता रुंदीकरणामुळे व्यवसाय वाढेल, अशी आशा केली होती. पण प्रत्यक्षात दुकानांसमोरच गाड्यांच्या रांगा लागल्याने ग्राहक पोहोचू शकत नाहीत. यामुळे अनेक दुकानदारांचे व्यवसाय ‘रोडावले’ असून, येथील कित्येक आस्थापने बंद पडलेल्या अवस्थेत आहेत.

पार्किंगच्या जागेवरून अनेकदा वादावादीचे प्रसंग घडतात. काही प्रसंगी हे वाद हातघाईवरही गेले आहेत. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही वाहतूक पोलीस परिस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आहेत.
रस्ता रुंदीकरणाचा हेतू रहदारी सुकर करणं हा होता, पण आज या रस्त्यावर वाहने सर्रासपणे पार्क केल्याने मूळ उद्देशच फोल ठरत आहे. शहरात दररोज वाढणाऱ्या वाहनांची संख्या पाहता, नियोजनशून्य रुंदीकरण हा समस्येवर उपाय ठरणार नाही. यासाठी प्रभावी पार्किंग व्यवस्था, पोलिसांची नियमित कारवाई, आणि स्थानिक प्रशासनाचे सक्रिय धोरण आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
रामलिंग खिंड गल्लीसारख्या रस्त्यांची केवळ रुंदीकरण नव्हे, तर सुयोग्य नियोजन, अंमलबजावणी आणि नियंत्रण हीच शहराच्या वाहतुकीला दिलासा देऊ शकतात. अन्यथा ‘रस्ता रुंद – पण वाहतुकीसाठी बंद’ अशी परिस्थिती निर्माण होणार, यात शंका नाही.