बेळगाव लाईव्ह :तोंडावर आलेल्या खरिप हंगामाचा प्रामाणीकपणे विचार करुन बेळगाव परिसरात लागणारी बासमती, इंद्रायणी भात बियाणं सरकारने तात्काळ उपलब्ध करुन देत आक्रम-सक्रम योजनां पुन्हा सुरु करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
बेळगावसह परिसरात उत्तम प्रकारची कृषी जमीन असल्याने या भागात इतर भाताच्या तुलनेत शेतकरी जास्तीत जास्त बासमती, इंद्रायणी भाताची पीकं घेतात. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा विचार करुन त्यांना हवी असलेली बियाणं उपलब्ध करुन देन सरकारचे उदिष्ट असले पाहिजे.
तथापि तसे न घडता येथील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सर्रास दुर्लक्षच केले जाते. शेतकऱ्यांना जर बासमती, इंद्रायणी बियाणं हवी असल्यास त्यांना ती बाजारात बासमती प्रति किलो 80 रु. आणि इंद्रायणी प्रति किलो 90 रु. दराने खरेदी करावा लागतो. मात्र हेच भात शेतकऱ्यांकडून खरेदी करतानां बासमती 3500 रु. क्विंटल तर इंद्रायणी 2500 रु. क्विंटल इतका दर दिला जातो.
सदर बियाणांची दुप्पट, तिप्पट दराने होणारी विक्री पाहता शेतकऱ्यांच्या हातात धतुराच दिल्यासारखी परिस्थिती आहे. एकंदर सध्या धन्यास कण्या,चोरास मलिदा अशीच परिस्थिती आहे.
कर्नाटकात सध्या अस्तित्वात असलेले सरकार शेतकऱ्यांच्या मदतीनेच स्थापन झाले आहे. निवडणुकीआधी पंचहमी योजनां जाहिर केल्या पण एका हाताने देत असतानां दुसऱ्या हाताने शेतकऱ्यांकडून दुप्पट प्रमाणात वसूली जात असल्याचे आता शेतकऱ्यांना कळाले आहे.
शेतकऱ्यांच्या कुपनलिकेपर्यंत विद्यूत पुरवठा देणारी अक्रम-सक्रम योजना बंद, विमा योजना बारगळली, मागचे सरकार शेतकऱ्यांना परिहार धन म्हणून देत असलेले वार्षिक 4 हजार रु.बंद, शेतकऱ्यांच्या पीकाला हमीभाव नाही, रासायनिक खतांच्या किमती दुप्पट-तिप्पट, शेतातील मशागती, मजूरीत वाढ या परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
तेंव्हा सरकारने तोंडावर आलेल्या खरिप हंगामाचा प्रामाणीकपणे विचार करुन बेळगाव परिसरात लागणारी बासमती, इंद्रायणी भाताची बियाणं तात्काळ उपलब्ध करुन देत आक्रम-सक्रम योजनां पुन्हा सुरु करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा येणाऱ्या काळात शेतकरी कर्नाटक सरकारला धडा शिकवल्याशिवाय रहाणार नाहीत, अशी प्रतिक्रिया नाराज शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.




