बेळगाव लाईव्ह : १ मेपासून संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चला काम करूया (‘दुडियोन बा’) मोहिम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेमुळे पात्र मजुरांना मनरेगा योजनेबद्दल माहिती मिळणार असून, त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील, असे जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
मनरेगामध्ये अद्याप नोंदणी न केलेल्या कुटुंबांची ओळख पटवून त्यांना अकुशल कामासाठी नोंदणी करणे,, नोंदणीकृत मजुरांना नियमितपणे रोजगार उपलब्ध करून देणे व स्थलांतराचे प्रमाण कमी करणे, दुर्बल घटक, महिलांना, दिव्यांगांना व तृतीयपंथीयांना कामात सहभागी करून घेणे अशी या मोहिमेची उद्दिष्टे असून या मोहिमेमध्ये पात्र लाभार्थींनी त्यांच्या ग्रामपंचायतींशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्यांनी आधीच मनरेगा योजनेंतर्गत नोंदणी करून काम सुरू केले आहे, अशा सर्व मजुरांसाठी १ मेपासून आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आले आहेत. या शिबिरांमधून मजुरांचे आरोग्य तपासले जाणार असून, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल.
सर्व मजुरांनी या शिबिरांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. सर्व ग्रामपंचायतींमध्ये नोंदणीकृत मजुरांची माहिती “नोंदणी रजिस्टर 1” नुसार घरभेटीच्या माध्यमातून तपासली जाणार आहे. यात नवीन पात्र मजुरांची नोंदणी तसेच आवश्यक असल्यास नाव हटविण्याचे काम केले जाणार आहे. पात्र नागरिकांनी या सर्व उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.