बेळगाव लाईव्ह :अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर जलसंवर्धन आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठी समर्पित एक अग्रगण्य स्वयंसेवी संस्था प्यास फाउंडेशनने बेळगाव जिल्ह्यातील त्यांचे दोन ऐतिहासिक तलाव प्रकल्प अभिमानाने हस्तांतरित केले आहेत. कॅम्प बेळगाव येथील धोबी घाट तलाव आणि गजपती येथील तलाव हे ते दोन तलाव प्रकल्प आहेत.
पहिला प्रकल्प धोबी घाट तलाव हा गेल्या 50 वर्षांहून अधिक काळात बेळगावमध्ये बांधलेला ‘पहिला मानवनिर्मित तलाव’ म्हणून एक महत्त्वाचा टप्पा आहे. दीड एकरामध्ये पसरलेल्या या तलावात पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी आणि घरटे वाढवण्यासाठी फळे देणारी झाडे लावलेले एक बेट असून ज्यामुळे एक समृद्ध सूक्ष्म-परिसंस्था तयार होते.
स्नेहम टेपिंग सोल्युशन्सच्या सीएसआर सहाय्याने आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजीच्या तांत्रिक मार्गदर्शनाने हा तलाव विकसित करण्यात आला आहे. तलाव हस्तांतरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ राजीव कुमार आयडीईएस यांच्याकडे औपचारिकपणे तलाव सुपूर्द करण्यात आला. या कार्यक्रमाला सीएसआर भागीदार अनिश मेत्राणी (स्नेहम टेपिंग सोल्युशन्स), नितीन खोत, पुरंदर (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी) आणि सतीश मन्नूरकर यांच्यासह बेळगावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य आणि अनेकांनी उपस्थिती लावली. ब्रिगेडियर मुखर्जी यांनी प्यास फाउंडेशनच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि प्रयत्नांना मिळालेल्या फळाबद्दल अत्यंत समाधान व्यक्त केले. सीईओ राजीव कुमार यांनी प्रकल्पाचे महत्त्व मान्य केले आणि सार्वजनिक हितासाठी बागेसह तलावाचा आणखी विस्तार करण्याचे आश्वासन दिले.

आणखी एका मोठ्या घडामोडीत प्यास फाउंडेशनने 7.5 एकरांवर पसरलेला पुनरुज्जीवित गजपती तलाव हा गजपती ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केला. हा फाउंडेशनचा 14 वा यशस्वी तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प आहे. बेळगाव येथील जिनाबाकुल फोर्ज प्रायव्हेट लिमिटेडच्या सीएसआर निधीतून हा प्रकल्प शक्य झाला आहे. गजपती तलाव हस्तांतरण समारंभाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे पद महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भूषवले होते. सन्माननीय अतिथी म्हणून जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे आणि युवा नेते मृणाल हेब्बाळकर उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री हेब्बाळकर यांनी प्यास फाउंडेशनच्या कामाचे कौतुक केले आणि भविष्यातील प्रकल्पांसाठी सतत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमास जिनाबाकुल फोर्ज प्रा. लि.चे सीएसआर भागीदार भालचंद्र बदन, किरण जिनागौडा, संतोष केलगेरी आदींसह बहुसंख्य स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. सदर दोन्ही तलाव हस्तांतरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्यास फाउंडेशनचे डॉ. माधव प्रभू (अध्यक्ष), डॉ. प्रीती कोरे (सचिव), अभिमन्यू डागा (उपाध्यक्ष), लक्ष्मीकांत पसारी (कोषाध्यक्ष), दीपक औलकर, अवधूत सामंत, सूर्यकांत हिंडलगेकर, रोहन कुलकर्णी आणि सतीश लाड (सर्व संचालक) यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्यास फाउंडेशन पाण्याची शाश्वतता, पर्यावरणीय पुनर्संचयितता आणि सामुदायिक विकासासाठी वचनबद्ध आहे. हे दोन यशस्वी प्रकल्प नागरी समाज, सरकार आणि कॉर्पोरेट भागीदारांमधील सहकार्याच्या शक्तीचा जणू पुरावा दर्शवतात.