बेळगाव लाईव्ह: भारतीय रेल्वेने बेंगलोर आणि बेळगाव दरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा मंजूर केली आहे. पूर्वीच्या बेळगाव-धारवाड वंदे भारतचा विस्तार सुचविणाऱ्या अहवालांविरुद्ध पूर्णपणे नव्या असणाऱ्या या सेवेमध्ये नैऋत्य रेल्वे (एसडब्ल्यूआर) विभागाला एक समर्पित रेक वाटप करण्यात येईल.
डेक्कन हेराल्डने उद्धृत केलेल्या एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, नवीन वंदे भारत रेल्वे सकाळी बेळगाव येथून सुटेल आणि दुपारी केएसआर बेंगलोरला पोहोचेल.
रेल्वेचा परतीचा प्रवास दुपारी सुरू होऊन संध्याकाळी उशिरा बेळगाव येथे समाप्त होईल. सुरुवातीला या रेल्वेला आठ डबे असणार असले तरी प्रवाशांच्या मागणीनुसार डब्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या रेल्वेची प्राथमिक देखभाल बेळगावमध्ये केली जाईल.
बेळगावसाठी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेची गेल्या 21 नोव्हेंबर 2023 रोजी चांचणी घेतली गेली. त्यावेळी या रेल्वेने 610.6 कि.मी. अंतर अंदाजे 7 तास 55 मिनिटांत पूर्ण केले होते. जे सध्याच्या या मार्गावरील सर्वात वेगवान रेल्वे पेक्षा जवळजवळ दोन तास अधिक वेगवान आहे.
तथापि धारवाडपासून या रेल्वेची सेवा बेळगावपर्यंत वाढवण्याच्या योजनेला जुळ्या शहरांमधील राजकीय नेत्यांसह विविध स्तरांकडून विरोध झाला. त्यामुळे या पद्धतीने स्वतंत्र वेगळी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बेळगाव निघणारी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे लोंढा, धारवाड, हुबळी, हावेरी, दावणगेरे, तुमकुरु आणि यशवंतपूर यासारख्या प्रमुख स्थानकांवर थांबेल अशी अपेक्षा आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना 6 मे 2025 रोजी लिहिलेल्या आपल्या पत्रात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवीन सेवेच्या मंजुरीची पुष्टी केली आहे.
“तुम्हाला हे जाणून आनंद होईल की नवीन बेळगाव- बेंगलोर वंदे भारत रेल्वेला मंजुरी देण्यात आली आहे. ही सेवा सकाळी बेळगावहून बेंगलोरसाठी निघेल. परतीच्या प्रवासाची दुपारी बेंगलोरहून सुटून बेळगावला पोहोचेल.” असे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
ही पुष्टी एक सकारात्मक पाऊल असले तरी सदर रेल्वे सेवा सुरू होण्याची नेमकी तारीख आणि तपशीलवार वेळापत्रक अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेले नाही. या संदर्भात प्रवाशांना आणि भागधारकांना अधिक माहितीसाठी औपचारिक सूचनांची वाट पाहण्याचा सल्ला रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.