बेळगाव लाईव्ह :नीट मार्क फॉर मनी घोटाळ्याच्या चौकशीत राजकोट पोलीस गुन्हा शाखेने पॅन-इंडिया रॅकेट उघडकीस आणले असून ज्यामध्ये बेळगावच्या मनजीत जैन याचा समावेश आहे. मनजीत हे सीबीएसई परीक्षा समन्वयक असून बेळगावच्या बिर्ला इंटरनॅशनल स्कूल या शाळेचा चालक असल्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
राजकोट येथे नीट मार्क फॉर मनी अर्थात पैसे घेऊन नीट मार्क घोटाळ्याच्या चौकशीत पॅन-इंडिया रॅकेट उघडकीस आले आहे. संबंधित टोळीने महाराष्ट्र, दिल्ली आणि बिहार, गुजरातसह किमान 30 वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना लक्ष्य केले होते. मोठ्या रकमेच्या बदल्यात त्यांचे मार्क वाढवण्याचे आश्वासन देऊन ही टोळी त्यांच्या गुणांमध्ये फेरफार करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 20 लाख ते 50 लाख रुपये आकारत होती असे शुक्रवारी राजकोट शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेला आढळून आले आहे.
हा घोटाळा गेल्या 2 वर्षांपासून सुरू होता. यापूर्वी राजकोट पोलिसांच्या गुन्हा शाखेने शिक्षण सल्लागार विपुल तेरैया आणि रॉयल अकादमी राजकोट येथील कोचिंग इन्स्टिट्यूटचे मालक राजेश पेठाणी यांच्यासह 5 जणांना अटक केली होती. त्यांनी जेतपूर येथील तक्रारदाराला त्याच्या मुलाचे 2024 च्या नीट परीक्षेचे गुण वाढवण्याचे आश्वासन देऊन 30 लाख रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे. सदर घोटाळ्यातील सुरतमध्ये कन्सल्टन्सी चालवणारा तेरैयाचा भाऊ प्रकाश, कर्नाटकातील सीबीएसई परीक्षा समन्वयक तथा बेळगावच्या बिर्ला इंटरनॅशनल स्कूलचा चालक मनजीत जैन आणि उदयपूर येथील धवल संघवी हे तीन आरोपी अजूनही फरारी आहेत.
टाइम्स ऑफ इंडिया या आघाडीच्या दैनिकाने या चौकशी संदर्भात सविस्तर वृत्त 10 मे रोजी प्रसिद्ध केले आहे. या वृत्तावरून नीट घोटाळ्यात बेळगावचे कनेक्शन उघड झाले आहे. आता राजकोट पोलिस बेळगावच्या बिर्ला स्कूलचा मालक मनजीत जैन याच्या शोधात असल्याची माहिती मिळाली आहे.

देशभरात प्रचंड खळबळ माजवलेल्या या घोटाळ्यातील रॅकेट मध्ये बेळगावचे अर्थात संबंधित मनजीत जैन या बिर्ला स्कूल चालकाचे नाव आहे का? याची पुष्टी करण्यासाठी बेळगाव live प्रतिनिधीने राजकोट पोलिसांशी संपर्क साधला असता विशेष तपास पथक स्थापून याबद्दल रॅकेट मधील सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर पुढील कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईतील पुढील प्रक्रियांसाठी बेळगाव पोलिस आयुक्तालयाचीही मदत घेतली जाणार आहे. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात अनेकांनी बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलेला असताना या घोटाळ्यात एका संस्थाचालकाच्या सहभागाने बेळगावची मान खाली गेली असून नाराजी व्यक्त होत आहे.