बेळगाव लाईव्ह : संतीबस्तवाड येथे पवित्र धर्मग्रंथाची विटंबना करणाऱ्यांना त्वरित अटक न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा मुस्लिम बांधवांनी दिल्यानंतर, बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीसह संपूर्ण बेळगाव तालुक्यात आज शुक्रवार सकाळपासून रात्री १२ वाजेपर्यंत कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आंदोलनाचे केंद्र असलेल्या राणी चन्नम्मा चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने या चौकाला छावणीचे स्वरूप आले आहे.
बेळगाव पोलिसांनी सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत शहरात जमावबंदीचा आदेश जारी केला होता. यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी चन्नम्मा चौकात बॅनरबाजीही केली होती. मात्र, या आदेशाला न जुमानता आज हजारो मुस्लिम नागरिकांनी चन्नम्मा चौकात एकत्र येत निदर्शने केली. शुक्रवारी सकाळपासूनच मुस्लिम समाजाने आपले व्यवहार बंद ठेवले होते. अंजुमन मैदानावर नमाज पठणानंतर हजारो मुस्लिम बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि चन्नम्मा चौकात जमून आंदोलन केले. उत्तर मतदारसंघाचे आमदार असिफ सेठ, युवा नेते अमान सेठ यांच्यासह आजी-माजी नगरसेवक आणि मोठ्या संख्येने मुस्लिम नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. संतीबस्तवाड धर्मग्रंथ विटंबना प्रकरणी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी आंदोलकांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना आमदार असिफ सेठ म्हणाले, संतीबस्तवाडमधील धर्मग्रंथ जाळणे अक्षम्य आहे. पोलीस आयुक्तांनी ७ दिवसांत अटकेचे आश्वासन दिले आहे. यापूर्वी ३ दिवसांची मुदत दिली होती, पण ते ईदगाहची भिंत पाडणाऱ्यांना पकडण्यात व्यस्त होते. आता धर्मग्रंथ जाळणाऱ्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू आहे. निष्काळजी पोलीस अधिकारी निलंबित झाले आहेत. शांतता राखून पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले.

संतीबस्तवाड येथील प्रार्थनास्थळातील पवित्र धर्मग्रंथ अज्ञात समाजकंटकांनी जाळल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. धार्मिक भावना दुखावणारी ही घटना १२ मे रोजी सकाळी उघडकीस आल्यानंतर बेळगाव शहरातील मुस्लिम समाजात तीव्र संतापाची लाट उसळली होती. त्यांनी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे तीव्र आंदोलन करून तीन दिवसांच्या आत आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. मागणी पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतली असून शहर पोलीस आयुक्तालयासह संपूर्ण बेळगाव तालुक्यात जमावबंदी लागू केली आहे. राणी कित्तूर चन्नम्मा चौकासह शहरातील संवेदनशील भागांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राणी चन्नम्मा चौकात तर प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून या परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांना आज सकाळी पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी मार्गदर्शन केले आणि सतर्क राहून कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले.
याप्रकरणी बोलताना पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग म्हणाले की, संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. अद्याप कोणतेही ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत. मात्र, जुन्या काही प्रकरणांमधील आरोपींना ताब्यात घेऊन काही माहिती मिळते का, याचा तपास सुरू आहे. संतीबस्तवाड धर्मग्रंथ विटंबना प्रकरणाचा चोहोबाजूंनी तपास सुरू असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल.
याचवेळी माध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त मार्बन्यांग यांनी सांगितले की, धर्मग्रंथ जाळण्याच्या प्रकरणाची कसून चौकशी सुरू असून गुन्हेगारांना लवकरच अटक केली जाईल. या प्रकरणाचा तपास करत असतानाच, एक महिन्यापूर्वी संतीबस्तवाड येथील इदगाहला धक्का पोहोचवल्याच्या आरोपावरून चौघांना नुकतीच अटक करण्यात आली आहे. धर्मग्रंथ विटंबनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसले तरी, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून त्यासाठी पाच विशेष पथके कार्यरत आहेत आणि संपूर्ण तपासासाठी वेळ लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.




