बेळगाव लाईव्ह : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत १ जून १९८६ रोजी कन्नड सक्तीविरोधी आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यावर चर्चा झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व मराठी भाषिकांनी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाकडे जमावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या बैठकीत माजी आमदार तथा तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी कन्नड सक्तीच्या विरोधात ४० वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “गेल्या ४० वर्षांत नऊ हुतात्म्यांनी कन्नड सक्तीविरोधात हौतात्म्य पत्करले, तरीही कन्नड सक्तीचा जाच आजही कायम आहे.
” सीमाप्रश्नाची सोडवणूक आणि मराठी भाषिकांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणे गरजेचे आहे, असे किणेकर यांनी अधोरेखित केले. एकजुटीने या लढ्यात उतरण्याचे आवाहन करत, १ जून रोजी मोठ्या संख्येने हिंडलगा येथे जमण्याचे आवाहन त्यांनी केले.
बैठकीच्या सुरुवातीला विविध मान्यवर आणि कार्यकर्त्यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
या बैठकीत एक महत्त्वपूर्ण सामाजिक मुद्दाही चर्चिला गेला. मराठा समाजातील विवाह समारंभात मुहूर्ताचे गांभीर्य पाळले जात नाही, यावर किणेकर यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “पत्रिकेत विवाह मुहूर्त नमूद केलेला असतो, मात्र अलीकडे विवाह मुहूर्तावर होत नाहीत. यामुळे वधू-वरांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.” ही चुकीची प्रथा थांबवण्यासाठी किणेकर यांनी एक कठोर उपाय सुचवला: “विवाह समारंभास उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी जर वेळेवर विवाह होत नसल्यास विवाहस्थळावरून भोजन न करताच माघारी फिरावे आणि विवाहसोहळ्यावर बहिष्कार घालावा.” समाज भरकटत चालला असून, त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि योग्य दिशा दाखवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच मराठा समाजातील नेत्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीत हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाभोवतीच्या जागेच्या प्रश्नावरही चर्चा झाली. याबाबत बोलताना मनोहर किणेकर पुढे म्हणाले, स्मारकाच्या परिसरात अनेक घरांचे बांधकाम झाले आहे, परंतु जिल्हा प्रशासनाकडून जाणीवपूर्वक ही जागा बिगरशेती नसल्याचे सांगत आडमुठे धोरण राबवले जात आहे. “हुतात्मा स्मारक उभारल्यास कर्नाटक सरकारची अब्रू चव्हाट्यावर येईल, या भीतीपोटी प्रशासन असे करत आहे,” असे ते म्हणाले. कन्नड संघटनांनी जरी विरोध केला असला तरी, आता आपण कायदेशीर पद्धतीने आपले म्हणणे मांडू, असे किणेकर यांनी स्पष्ट केले. “कुणाच्याही दबावाखाली येऊन आपल्या लढ्याची दिशा बदलता कामा नये,” केंद्र सरकारने सीमाभाग वादग्रस्त असल्याचे मान्य केले असून, सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. या लढ्यात सर्वांनी एकजुटीने पुढे येऊन १ जून रोजी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी पुन्हा केले.
या बैठकीला माजी महापौर आणि म.ए. समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव पाटील, विकास कलघटगी,लक्ष्मण होनगेकर, बी.डी. मोहनगेकर आदींसह म.ए. समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
