बेळगाव लाईव्ह : फळांचा राजा हापूस आंब्याचा बेळगाव बाजारपेठेतील मोसम संपत आला असून आवक कमी झाल्यामुळे कोकणातील हापूस आंब्याचा दर वाढला आहे .गुरुवारी 8 मे रोजी बेळगाव फ्रुट मार्केट मधील एम बी देसाई सन्स यांच्या दुकानात हापूस आंबा 500 रुपयांपासून ते 1500 रुपया पर्यंत विकला जात आहे.
बेळगाव बाजारपेठेमध्ये हापूस आंबा गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दाखल झाला. त्यावेळी आंब्याचा दर क्वालिटीनुसार 1200 ते 4000 रुपयांपर्यंत होता.
त्यानंतर मार्च महिन्यात हा दर कमी होऊन त्यानंतर एप्रिल महिन्यात तो एकदमच कमी होऊन सरासरी 400 ते 1200 रुपये इतका झाला होता. आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंब्याची आवक हळूहळू कमी होऊ लागल्यामुळे दर पुन्हा तेजीत येऊ लागला आहे.

सध्या बाजारपेठेत कोकणातील हापूस आंब्याचा दर 500, 800, 1200 ते 1500 रुपये प्रति डझन इतका सुरू आहे. मे महिना सुरू झाल्यामुळे हापूस आंब्याचा सिझन आता अंतिम टप्प्यात आलाआहे.
कोकणातील आंब्याची बेळगाव फळ मार्केट मधील आवक रोडावली आहे यापूर्वी मार्केटमध्ये रत्नागिरी वगैरे भागातून 5000 बॉक्स इतका हापूस आंबा येत होता मात्र आता तो 800, 1000 बॉक्स इतका कमी झाला आहे. या पद्धतीने बाजारपेठेत हापूस आंबा कमी होत असताना कर्नाटक आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होऊन ती वाढत आहे. एकंदर मे महिन्याअखेर हापूस आंब्याचा मोसम संपणार असल्यामुळे तोपर्यंतच बेळगावकरांना हापूसची चव चाखायला मिळणार आहे.