बेळगाव लाईव्ह :लोकायुक्त पोलिसांनी महिला व बाल कल्याण खात्याच्या कार्यालयावर धाड टाकून अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या बदलीसाठी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना कार्यालयीन अधीक्षक व कॉम्प्युटर ऑपरेटरला रंगेहात पकडल्याची घटना आज घडली.
लोकायुक्तांच्या जाळ्यात सापडलेल्या कार्यालयीन अधीक्षकाचे नांव अब्दुल वली आणि कॉम्प्युटर ऑपरेटरचे नाव सौम्या बडीगेर असे आहे. बदलीसाठी अंगणवाडी सहाय्यीकेकडे त्यांनी 30 हजार रुपयांची मागणी केली होती.
हुक्केरी तालुक्यातील अंगणवाडी सहाय्यिका शकुंतला कांबळे हिने त्यासंदर्भात लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत लोकायुक्त पोलिसांनी आज गुरुवारी सापळा रचून महिला व बालकल्याण खात्याच्या कार्यालयावर धाड टाकली.

तसेच उपरोक्त दोघांना 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. लोकायुक्त पोलीस निरीक्षक धर्मट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या लोकायुक्तांच्या धाडीमुळे भेदरलेल्या कॉम्प्युटर ऑपरेटर सौम्या हिची प्रकृती अचानक बिघडली.
तेंव्हा तात्काळ डॉक्टरांना बोलावून कार्यालयातच लोकायुक्त अधिकाऱ्यांनी तिच्यावर उपचार करवले. या प्रकरणी लोकायुक्त पोलिसात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे. लोकायुक्त पोलिसांच्या आजच्या या धाडीमुळे अंगणवाडीशी संबंधित इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.