बेळगाव लाईव्ह :बागलकोट, गदग, हावेरी जिल्ह्यांमध्ये छापे टाकून तपासणी केल्यानंतर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज शनिवारी पहाटे बेळगाव जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना ‘शॉक’ देताना तीन ठिकाणी अचानक धाडी टाकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
बेळगाव लोकायुक्त पोलीस अधीक्षक हणमंतराय यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त कारवाई करण्यात आली. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज पहाटे पहाटे बेळगाव येथील देवराज अरस विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सिध्दलिंगप्पा एन. बाणसी यांच्या निवासस्थानासह कार्यालयावर एकाच वेळी धाड टाकली.
सिध्दलिंगप्पा यांच्या घर नं. 211, चौथा रस्ता, विद्यानगर बेळगाव आणि रायबाग तालुक्यातील बेक्केरी गावामध्ये असलेल्या निवासस्थानांवर तसेच कार्यालयांवर टाकलेल्या धाडीमध्ये लोकायुक्त अधिकाऱ्यांनी चौकशीसह कागदपत्रांची तपासणी केली.
धारवाड सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता एच. सी. सुरेश यांच्या हनुमाननगर बेळगाव येथील निवासस्थानावर, त्याचप्रमाणे गदगच्या निर्मिती केंद्राचे प्रकल्प संचालक गंगाधर शिरोळ यांच्या घरावर देखील आज लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या धाडी पडल्या.
या पद्धतीने बेळगाव लोकायुक्त व्याप्तीतील एकूण तीन ठिकाणी आज शनिवारी पहाटे धाडसत्र राबविण्यात आले. यामुळे भ्रष्ट सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडून त्यांचे धाबे दणाणले आहेत.




