मलप्रभेची वाढली पातळी : बेळगाव-चोर्ला राज्य महामार्ग बंद!

0
26
 belgaum

बेळगाव लाईव्ह : मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील कुसमळीजवळील मलप्रभा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून काल रविवार आणि आज सोमवारी बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

मलप्रभेच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्याने तात्पुरता पर्यायी पूल धोक्यात आल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अधिकाऱ्यांनी मार्ग बंद केला आहे. या पद्धतीने बेळगाव-गोवा आंतरराज्य रस्ता बंद केल्याने या मार्गावर नित्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. परिणामी स्थानिक प्रशासनाने वाहनचालकांना परिस्थिती सुधारेपर्यंत पर्यायी मार्ग म्हणून जांबोटी-खानापूर मार्गाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

ब्रिटीश काळात बांधलेला मलप्रभा नदीवरील मूळ पूल कालांतराने कमकुवत झाला असून वाहनांच्या वाहतुकीसाठी असुरक्षित मानला जात होता. सुरक्षित संरचनेसाठी वारंवार मागणी केल्यानंतर जानेवारीमध्ये हा पूल पाडण्यात आला आणि त्याच ठिकाणी नवीन पुल बांधण्याचे काम सुरू झाले. बांधकामादरम्यान संपर्क राखण्यासाठी, बांधकाम सुरू असलेल्या जागेला लागूनच कॉम्पॅक्टेड मातीपासून बनवलेला तात्पुरता पर्यायी पूल बांधण्यात आला आहे.

 belgaum

गेल्या जानेवारीपासून, या तात्पुरत्या हंगामी पुलामुळे बेळगाव आणि गोवा दरम्यान वाहतूक सुरळीत सुरू होती. तथापि, गेल्या आठ दिवसांपासून सततच्या मान्सूनपूर्व पावसामुळे मलप्रभा नदी दुथडी भरून वाहत आहे.

विशेषतः लघु पाटबंधारे विभागाने देवाचीहट्टी, तोरळी आणि आमटे येथील पूल आणि बंधाऱ्यांवरील फळ्या काढून टाकल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. तात्पुरत्या पुलाचा कांही भाग पाण्याखाली जाऊन तो प्रवासासाठी असुरक्षित बनला आहे. बेळगाव-चोर्ला महामार्ग बंद झाल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होऊन स्थानिक नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, नवीन कायमस्वरूपी पुलाचे बांधकाम संथ गतीने सुरू आहे. या प्रकल्पासाठी राष्ट्रीय विकास प्राधिकरणाअंतर्गत 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सुरुवातीला पुलाचे बांधकाम नोव्हेंबरमध्ये सुरू होणार असले तरी, कंत्राटदाराने ते जानेवारीमध्ये सुरू केले.

सहा कमानी असलेल्या या पुलावर सध्या तीन स्लॅब टाकण्यात आले असून उर्वरित कमानींचे काम सुरू आहे. अधिकाऱ्यांचा अंदाजानुसार हा पूल बांधून पूर्ण होण्यासाठी आणखी 1.5 ते 2 महिने लागतील. सध्या अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच नवीन पूल तयार होईपर्यंत आणि हवामान स्थिर होईपर्यंत नागरिकांना वाहतूक वळवण्यास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.