बेळगाव लाईव्ह : कित्तूर मार्गे बेळगाव -धारवाड नव्या रेल्वे मार्ग उभारणीसाठीचे काम हाती घेण्यासंदर्भातील 80 टक्के प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित 20 टक्के अल्पावधीत पूर्ण होईल आणि त्यानंतर 6 महिन्यात या रेल्वे मार्गाच्या उभारणीच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली.
शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल जवळील आपल्या कार्यालयामध्ये आज शुक्रवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. खासदार जगदीश शेट्टर म्हणाले की, बेळगावचे तत्कालीन खासदार दिवंगत सुरेश अंगडी यांनी जो कित्तूर मार्गे बेळगाव -धारवाड असा नवा रेल्वे मार्ग मंजूर करून घेतला होता. त्यासाठी आवश्यक असलेली भूसंपादनाची प्रक्रिया गेल्या दोन-तीन वर्षात झालीच नव्हती.
मात्र आता सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या मार्गाचे सर्वेक्षण होऊन इतर सर्व वगैरे प्राथमिक कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. आता फक्त राज्य शासनाने आवश्यक 200 -300 कोटी रुपयांचा निधी मंजूर करावयास हवा. त्या संदर्भात माझी राज्याच्या सचिवांशी चर्चा झाली असून त्यांनी शक्य होईल तितक्या लवकर निधी मंजूर करण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिले आहे.
सदर निधी उपलब्ध झाला की संबंधित जमिनी ताब्यात घेऊन कामाला सुरुवात करणे सुलभ जाणार आहे. निधी मंजूर होताच दोन-तीन महिन्यात निविदा प्रक्रिया हाती घेतली जाईल आणि पुढे 5 -6 महिन्यात रेल्वे मार्ग उभारणीच्या कामाला सुरुवात केली जाईल.
दुसरीकडे लोकापूर रामदुर्ग सौंदत्ती मार्ग धारवाड पर्यंत नवा रेल्वे मार्ग उभारणीचे प्रयत्न देखील सुरू आहेत. सदर प्रकल्प केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाकारला होता. सदर नियोजित मार्गाचा यापूर्वीचा सर्वेक्षणाचा अहवाल नकारात्मक असल्यामुळे त्यामुळे त्यांनी नकार दिला होता. मात्र या संदर्भात मी दोन-तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी या प्रकल्पासंदर्भात सकारात्मक दृष्टिकोन दाखवला असून माझ्या पत्राला उत्तरही दिले आहे. तसेच नव्याने सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला जाईल असे त्यांनी सांगितले आहे. हा नवा रेल्वे मार्ग झाल्यास आपल्याला आणखी एक नवीन रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे, असे खासदार शेट्टर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेबद्दल तर आपल्याला कल्पनाच आहे. बेंगलोरपासूनची ही रेल्वे सेवा धारवाड येथून बेळगावपर्यंत विस्तारित होऊ शकत नसल्यामुळे आम्ही केंद्रीय मंत्र्यांकडे बेळगावपर्यंत नव्या विस्तारित मार्गाची विचारणा केली होती. आनंदाची गोष्ट म्हणजे केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी बेळगाव येथून बेंगलोरपर्यंत नवी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा मंजूर केली आहे. ही रेल्वे सकाळी बेळगाव येथून सुटून दुपारी बेंगलोरला पोहोचेल आणि परतीच्या प्रवासात दुपारी बेंगलोर येथून सुटून रात्री बेळगावला पोहोचेल.
या संदर्भातील वेळापत्रक लवकरच निश्चित केले जाणार आहे सदर नव्या रेल्वे सेवेचे उद्घाटन त्वरेने केले जावे अशी विनंती मी केली होती. तथापि देशातील या पद्धतीच्या सात -आठ रेल्वे सेवा एकाच वेळी सुरू केल्या जाणार असल्यामुळे या सर्व रेल्वे सेवांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदाच वर्चुअल पद्धतीने करणार आहेत. या उद्घाटनाची तारीख निश्चित होताच त्यानुसार बेळगाव बेंगलोर वंदे भारत सेवा सुरू होईल. एकंदर या पद्धतीने जनतेच्या महत्त्वाच्या आवश्यक अशा ज्या काही मागण्या आहेत त्यांची माझ्याकडून टप्प्याटप्प्याने पूर्तता केली जात आहे.
बेळगाव व्यापार, उद्योग वगैरे सर्वदृष्ट्या एक मध्यवर्तीय केंद्र व्हावे या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. याठिकाणी नवनवे उद्योग येण्यास सुरुवात झाली आहे. माझ्या मते या ठिकाणी जमिनीची कमतरता आहे. त्यासाठी काही सरकारी जमिनीची पाहणी करण्यासाठी मी आज दुपारी जाणार आहे. संबंधित जमिनी जर अनुकूल असतील तर राज्याच्या औद्योगिक मंत्र्यांशी चर्चा करून त्या सरकारी जमिनी ताब्यात घेण्याद्वारे तेथे नवे उद्योग आणण्याचा माझा प्रयत्न आहे. रस्ते, विमान आणि रेल्वे संपर्क या तीन गोष्टींसह पायाभूत सुविधा ज्या ठिकाणी असतात तेथे उद्योगधंदे आपण होऊन येतात.
त्या पद्धतीचे वातावरण बेळगावात निर्माण होत आहे. अनेक उद्योग या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली आहे. फक्त सध्या त्यासाठी जमिनीची कमतरता आहे. मात्र मला सरकारी पडीक जमिनींची माहिती मिळाली असून त्या जर योग्य असतील आणि येथील उद्योजकांची संमती असेल तर त्या जमिनी ताब्यात घेण्याचे प्रक्रिया मी सुरू करणार आहे, असे खासदार जगदीश शेट्टर यांनी शेवटी सांगितले.




