बेळगाव लाईव्ह : पुस्तकप्रेमींसाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या बुक लव्हर्स क्लबमध्ये शुक्रवारी जगदीश कुंटे यांचा ‘माझे तऱ्हेवाईक नातेवाईक’ हा आगळावेगळा कार्यक्रम उत्साहात पार पडला. लोकमान्य ग्रंथालय आणि वरेरकर नाट्यसंघ येथे आयोजित या कार्यक्रमात कुंटे यांनी दृकश्राव्य माध्यमाचा वापर करत एक उत्कृष्ट सादरीकरण केले.
कार्यक्रमाची सुरुवात क्लबचे उपाध्यक्ष किशोर काकडे यांनी प्रास्ताविक करून केली. यावेळी जगदीश कुंटे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छाही देण्यात आल्या.
स्वतः एक प्रतिथयश व्यंगचित्रकार असलेल्या कुंटे यांनी आपल्या सादरीकरणात व्यंगचित्रांच्या मनमोहक दुनियेची सफर घडवली. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते देश-विदेशातील अनेक दिग्गज व्यंगचित्रकारांची त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रांसह माहिती दिली.
“मार्मिक” मासिकातील बाळासाहेबांची व्यंगचित्रे पाहूनच आपल्याला व्यंगचित्रकलेची प्रेरणा मिळाल्याचे कुंटे यांनी सांगितले. व्यंगचित्रे रेखाटण्यासाठी उत्कृष्ट निरीक्षणशक्ती, चित्रकला आणि विनोदबुद्धी हे आवश्यक गुण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या सादरीकरणात आर. के. लक्ष्मण, शंकर पिल्ले, श्रीकांत ठाकरे, राज ठाकरे, गुरु डेव्हिड लो, अबू अब्राहम, ओ. व्ही. विजयन, मारिओ मिरांडा, सुधीर धर, उन्नी, केशव, सुरेंद्र, सुधीर तेलंग, बी. व्ही. राममूर्ती, शंकरराव किर्लोस्कर, बाळ राणे, दिनानाथ दलाल, हरिश्चंद्र लचके,
नागेश आर्डे, शी. द. फडणीस, वसंत सरवटे, वसंत गवाणकर, प्रभाकर ठोकळ, वसंत हळबे, मनोहर सप्रे, सुरेश लोटलीकर, ज्ञानेश सोनार, खलील खान, प्रभाकर वाईरकर, चंद्रशेखर पत्की, मंगेश तेंडूलकर, प्रशांत कुलकर्णी, मोजर, रेबर, सेम्पे, लेस्ली स्टार्क या आणि इतर अनेक व्यंगचित्रकारांचा समावेश होता.

प्रख्यात संपादक एम. व्ही. कामत यांच्या मताचा संदर्भ देत कुंटे म्हणाले की, “एका अग्रलेखापेक्षा एक छोटं व्यंगचित्र अधिक बोलून जातं.” मुखपृष्ठांवर आणि दिवाळी अंकातही व्यंगचित्रे कशी महत्त्वाची भूमिका बजावतात, हे त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी कुंटे यांनी या सर्व व्यंगचित्रकारांना आपले ‘नातेवाईक’ संबोधले. “हे सारे माझे ‘माझे नातेवाईक’ आहेत आणि प्रत्येकाची ‘तऱ्हा’ (स्टाइल) वेगळी असल्यामुळे ते ‘तऱ्हेवाईक’ही आहेत,” असे सांगत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
जगदीश कुंटे हे लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष आणि वरेरकर नाट्यसंघाचे कार्यवाह आहेत. यासोबतच ते ‘ज्ञान प्रबोधन’ शाळेच्या व्यवस्थापन समितीचे माजी सदस्य असून तरुण भारतचे सेवानिवृत्त मानव संसाधन व्यवस्थापक आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार म्हणून सर्वपरिचित आहेत. हा कार्यक्रम मराठी विकास संस्थेतर्फे बृहन्महाराष्ट्र संस्थांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत सादर करण्यात आला.