बेळगाव लाईव्ह : एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीने कर्करोगाच्या पूर्वीपासूनच्या आजाराचे कारण देत वैद्यकीय विमा दावा नाकारल्याने ग्राहक न्यायालयाने कंपनीला चांगलाच दणका दिला आहे. न्यायालयाने विमा कंपनीला ५ लाख रुपयांचे वैद्यकीय बिल, ८ हजार रुपये नुकसान भरपाई आणि ३ हजार रुपये खटल्याचा खर्च तक्रारदाराला देण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात वकील एन. आर. लातूर यांनी तक्रारदाराची बाजू मांडली. तक्रारदाराने घेतलेल्या वैद्यकीय विमा पॉलिसीमध्ये कर्करोगाचा समावेश असतानाही कंपनीने केवळ पूर्वीपासूनचा आजार असल्याचे कारण देत दावा नाकारला होता. या विरोधात तक्रारदाराने ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती.
ग्राहक न्यायालयात झालेल्या सुनावणीत वकील एन. आर. लातूर यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
विमा पॉलिसीच्या नियमांनुसार आणि कायद्यानुसार विमा कंपनीचा दावा नाकारण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याचे त्यांनी न्यायालयाला पटवून दिले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीला तक्रारदाराला ५ लाख रुपये वैद्यकीय खर्च, मानसिक त्रासासाठी ८ हजार रुपये नुकसान भरपाई आणि खटल्याचा खर्च म्हणून ३ हजार रुपये देण्याचे आदेश दिले.
ग्राहक न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे विमा कंपन्यांकडून वैद्यकीय दावे नाकारले जाणाऱ्या अनेक रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. विमा पॉलिसीमध्ये समावेश असतानाही केवळ पूर्वीपासूनचा आजार असल्याचे कारण देत दावे नाकारणे योग्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.