बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील भांदूर गल्ली परिसरात अलीकडे कांही तासांसाठी अचानक वीज पुरवठा खंडित केला जात आहे. आज देखील अचानक वीज गायब झाल्यामुळे गैरसोय झालेल्या नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत असून हेस्कॉमने पूर्वकल्पना देऊन लोड शेडिंग करावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भांदूर गल्ली परिसरातील वीज पुरवठा अलीकडे अचानक कांही तासांसाठी खंडित केला जात आहे. प्रत्येक वेळी कोणतेही कारण न देता घोषित पद्धतीने वीज खंडित केली जात असल्यामुळे विजेवर स्वयंपाकाची कामे करणाऱ्या गृहिणीवर्गासह या ठिकाणच्या व्यवसायिकांची मोठी गैरसोय होत आहे.
कांही व्यावसायिकांना नुकसानीचा सामनाही करावा लागत आहे. आज मंगळवारी देखील हाच अघोषित लोड शेडिंगचा प्रकार घडला आहे. भांदूर गल्ली येथील वीज आज सकाळी 10:30 वाजल्यापासून अचानक गायब झाली असून ती परत केंव्हा येणार याच्या प्रतीक्षेत येथील रहिवासी आहेत.
मागच्या मंगळवारी देखील याच पद्धतीने सकाळी 10:30 वाजता खंडित झालेला वीजपुरवठा दुपारी 3 वाजता पूर्ववत सुरू झाला होता. एकंदर या भागात हेस्कॉमकडून केल्या जाणाऱ्या विजेच्या लपंडावाचा फटका येथील रहिवाशी आणि कामधंदे करणाऱ्या व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे.
अघोषित लोड शेडिंगमुळे काही जणांचे नुकसानही होत आहे. त्यामुळे सबळ कारण असेल तर वीज खंडित करण्यास आमची कोणतीच हरकत नाही. मात्र त्याची पूर्वकल्पना दिली जावी.
तांत्रिक कारणासाठी शहरातील विविध भागांचा वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी ज्याप्रमाणे प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून जनतेला पूर्वकल्पना दिली जाते. तशी कल्पना आमच्या ठराविक भागातील वीज खंडित करण्यापूर्वी दिली जावी, अशी जोरदार मागणी भांदुर गल्ली येथील त्रस्त रहिवाशी आणि व्यावसायिकांनी हेस्कॉमकडे केली आहे.