बेळगाव लाईव्ह :भावी पिढी उत्तम शिक्षणाबरोबरच चांगली संस्कारी व्हावी यासाठी मराठा समाजातर्फे हल्याळ (जि. कारवार) येथे गुरुकुल स्थापन केले जाणार असून त्याच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. ठराविक भाषेला महत्त्व न देता या ठिकाणी मुलांना चांगले संस्कार व ज्ञान देऊन त्यांचे कल्याण करण्याला महत्त्व दिले जाईल अशी माहिती देऊन मराठा समाजाचा लाभ करून घेणाऱ्या विशेष करून बेळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गुरुकुलाला यथाशक्ती जास्तीत जास्त पाठिंबा देऊन त्याची उभारणी पूर्णत्वास नेण्यास हातभार लावावा, असे आवाहन प.पू. मराठा जगद्गुरु वेदांताचार्य श्री श्री श्री मंजुनाथ भारती महास्वामीजी यांनी केले.
शहरातील मराठा मंदिर येथे आज गुरुवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. स्वामीजी म्हणाले की, भाषावाद न करता आम्ही मूळ संस्कृतला प्राधान्य देणार आहोत. आम्ही ठराविक भाषेला महत्व न देता मुलांवर मग ते कोणत्या एका भाषेचे असेनात त्यांच्यावर चांगले संस्कार होऊन, ज्ञान मिळून त्यांचे कल्याण व्हावे याला महत्त्व देणार आहोत. आपली भावी पिढी उत्तम शिक्षणाबरोबरच चांगली संस्कारी व्हावी हे आमचे ध्येय आहे.
मुलांना ज्या भाषेचे ज्ञान आहे त्या भाषेत त्यांना ज्ञान दिले जाईल. मराठी मातृभाषा असलेल्या मुलांना मराठीत ज्ञान दिले जाईल त्यासाठी पंढरपूर आळंदी येथून काही कीर्तनकार येणार आहेत त्याचप्रमाणे वेदाभ्यास शिकवण्यासाठी काही पंडित काशीहून येणार असून काही कन्नड भाषेत वचनं वगैरे शिकवण्यासाठी कर्नाटकातून अनुभवी तज्ञ लोक येणार आहेत.
आमच्या गुरुकुलामध्ये जातीयवादाला वाव राहणार नाही, या ठिकाणी सर्वांचे स्वागत असेल. श्री ज्ञानेश्वर महाराज आमचे आराध्य असल्यामुळे आम्ही सर्व भाषांचे स्वागत करणार आहोत. आमचे गुरुकुल 5 ते 6 एकर जागेमध्ये उभारले जाणार असून त्याच्या बांधकामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सध्या या गुरुकुलामध्ये मुलांना मोफत शिक्षणआणि आहार दिला जाईल. आध्यात्मिक शिक्षण तर संपूर्णपणे विनामूल्य देण्याचा आमचा विचार आहे असे सांगून स्वामीजींनी गुरुकुलाच्या कार्यपद्धतीची थोडक्यात माहिती दिली. तसेच आपली भावी पिढी उत्तम शिक्षणाबरोबरच चांगली संस्कार व्हावी हे ध्येय समोर ठेवून आमच्या गुरुकुलात वयोमर्यादेची अट न घालता मुलांना घडवले जाईल. बेळगाव आणि गोव्यासह दावणगिरी, हुबळी धारवाड वगैरे प्रमुख शहरे जवळ असल्यामुळे उत्तर कर्नाटकातील मध्यवर्तीय ठिकाण असल्यामुळे आम्ही हल्याळ येथे हे गुरुकुल उभारत आहोत.
उत्तर कर्नाटकात मोठ्या संख्येने असलेला मराठा समाज हे देखील एक कारण आहे. हल्याळ येथील गुरुकुल सुरू झाल्यानंतर भविष्यात अन्यत्रही त्याच्या शाखा उघडल्या जातील, अशी माहिती श्री. मंजुनाथ भारती महास्वामीजींनी दिली.
ते पुढे म्हणाले की, एखादी संस्था, तिची इमारत उभारायची म्हणजे आर्थिक तसेच संबंधित अन्य गोष्टींची मदत ही लागतेच. त्या अनुषंगाने आमच्या गुरुकुल उभारणीसाठी आपल्यापरीने मदत करू इच्छिणाऱ्यांचे स्वागत आहे. मोठ्या अर्थसहाय्यासह अवघा एक रुपया अथवा बांधकामासाठी एखाद दुसरी वीट जरी कोणी मदती दाखल दिली तरी ती आम्ही आनंदाने स्वीकारू. राजकीय पक्षांमध्ये कार्य करणाऱ्यांनी गुरुकुलाला पर्यायाने समाजाला आपल्या पक्षाकडून मदत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तुम्ही आमदार, खासदार, मंत्री नसाल तरी जर माझ्यातील एक वर्ग तुमच्या पाठीशी असेल तर ज्या राजकारण्यासाठी तुम्ही कार्य करता त्यांच्याकडे तुम्ही समाजासाठी किंवा गुरुकुलासाठी आर्थिक मदतीची मागणी करणे यात काहीही गैर नाही.
त्याचप्रमाणे बेळगाव जिल्ह्यासह कर्नाटक व महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी लक्षात घ्यावे की त्यांच्यासाठी राजकीय दृष्ट्या उत्तर कर्नाटकातील मराठा समाज यापुढे निर्णायक ठरणार आहे. तेव्हा संबंधित आमदार खासदार मंत्री वगैरे सर्व लोकप्रतिनिधींना मराठा समाजातर्फे माझे आवाहन आहे की आमचे गुरुकुल हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरुकुल आहे आणि आमचा समाज तुमच्या पाठीशी आहे. तेंव्हा कोणताही विचार न करता या गुरुकुलासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करावे. या गुरुकुलाला तुमचा जास्तीत जास्त पाठिंबा असणे अत्यावश्यक आहे. मराठा समाज हा जातीयवादी नसून सर्वांशी सौजन्याने वागणारा उदार समाज आहे. वेळ आल्यास देशासाठी प्राणाची आहुती देणारा हा एकमेव समाज आहे. तेंव्हा या समाजाचा लाभ करून घेणाऱ्या विशेष करून बेळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मग ते कोणत्याही पक्षाचे असोत त्यांनी या समाजासोबत राहिलं पाहिजे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुकुलाला यथाशक्ती जास्तीत जास्त पाठिंबा देऊन त्याची उभारणी पूर्णत्वास नेण्यास हातभार लावणे गरजेचे आहे असे स्पष्ट करून त्यांनी तसे न केल्यास त्याचे उत्तर मी त्यांना भविष्यात देईन, असा अप्रत्यक्ष इशारा प.पू. मराठा जगद्गुरु वेदांताचार्य श्री. श्री. श्री. मंजुनाथ भारती महास्वामीजींनी शेवटी दिला. पत्रकार परिषदेत अनंत लाड, आप्पासाहेब गुरव आदी उपस्थित होते.