बेळगाव लाईव्ह :नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ असून पटसंख्या वाढवून ग्रामीण भागातील मराठी शाळा टिकवण्याच्या प्रयत्नांना सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने बेळगाव तालुक्यातील विविध गावांमधील मराठी शाळांमध्ये आज सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनींचे विशेष करून इयत्ता पहिलीच्या मुलांचे उत्साही स्वागत करण्यात आले.
नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यामुळे ग्रामीण भागातील विविध मराठी शाळांच्या व्यवस्थापनाकडून आपली शाळा भविष्यात टिकावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून किमान मराठी मातृभाषिक पालकांनी आपल्या मुलांना इयत्ता पहिलीपासून गावातील मराठी शाळेतच घालावे, यासाठी बेळगाव तालुक्यातील कर्ले, हालगा वगैरे विविध मराठी शाळांकडून मुलांच्या स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव तालुक्यातील कर्ले येथे चक्क बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून पहिलीच्या विद्यार्थ्यांचे उत्साही स्वागत करण्यात आले.
संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकवर्गाने आज शुक्रवारी सकाळी शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळेच्या प्रवेशद्वारावर थांबून विद्यार्थी -विद्यार्थिनींचे सुहास्य वदनाने उस्फुर्त स्वागत केले. गुरुजन मंडळी आपल्या स्वागतासाठी उभी असल्याचे पाहून विद्यार्थीवर्ग देखील आनंदीत झालेला पहावयास मिळत होता.

हालगा येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेच्या ठिकाणी आज सकाळी शाळेत येणाऱ्या मुला -मुलींचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी स्वागतासाठी प्रवेशद्वारावर थांबलेल्या शिक्षकवर्गात उत्साही वातावरण पहावयास मिळत होते.
त्याचप्रमाणे आपल्या स्वागताची लगबग रंगीबिरंगी टोप्या घालून रांगेत उभी असलेली इयत्ता पहिलीतील चिमुरडे मुले कुतूहलाने पाहताना दिसत होती.
कर्ले गावामध्ये तर तेथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेच्यावतीने शाळेत हजेरी लावणाऱ्या मुलांच्या स्वागतार्थ मिरवणुकीचे आयोजन केले होते. सजवलेल्या बैलगाडीसह गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेली विद्यार्थी -विद्यार्थिनींची ही सवाद्य मिरवणूक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती.
एकंदर या पद्धतीने तालुक्यातील विविध मराठी शाळांमध्ये पटसंख्या वाढण्याच्या दृष्टीकोनातून आज शुक्रवारी सकाळी विद्यार्थी -विद्यार्थिनींचा स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.