बेळगाव लाईव्ह: गुरुवारी मध्यरात्री रविवार पेठ कांदा मार्केट येथील प्लास्टिक दुकानाला आग लागून लाखोच्या नुकसान झालेली घटना ताजी असताना बेळगाव शहरातील सदाशिवनगर मध्ये देखील आजीची घटना घडली असून या घटनेतही लाखोंचे नुकसान झाले आहे.बेळगाव शहरातील सदाशिवनगर येथील विजय बेकरीमध्येही शॉर्टसर्किट मुळे आग लागून मोठे नुकसान झाले आहे.
बेळगाव सदाशिवनगर सेकंड क्रॉसजनजीक असलेल्या विजय बेकरीत लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले. यावेळी आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी विजय बेकरीचे मालक विनोद कदम यांना घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन विनोद कदम यांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण अनेकवेळा संपर्क करूनही प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा विनोद कदम यांनी आपले कर्मचारी आणि शेजाऱ्यांच्या मदतीने आग विझवण्यात यश मिळवले. मात्र तोपर्यंत या भीषण आगीत सर्व वस्तू जळून भस्मसात झाल्या होत्या.

अग्निशमन दलाच्या या निष्काळजीपणाबद्दल विनोद कदम यांनी नाराजी व्यक्त केली. या आगीमुळे सुमारे लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली.
गेल्या 24 तासाच्या अंतरावर बेळगाव शहरात आगीच्या मोठ्या दोन घटना घडल्या आहेत दोन्ही घटनांमधून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लाखोंचे साहित्य मात्र आगीत जळून खाक झाले आहे.