बेळगाव लाईव्ह :(बेळगावच्या माजी महापौर सौ निलिमा संभाजी चव्हाण यांचे 20 मे रोजी निधन झाले. आज त्यांचा बारावा दिवस त्यानिमित्त त्यांच्या मुलाने वाहिलेली ही आदरांजली.)
आमची मम्मा सौ निलिमा या सर्वांना सोडून आनंदात विलीन झाल्या आणि आम्ही पोरके झालो. महाराष्ट्रातील बांदा गावचे सरपंच असलेल्या विठू कृष्णा सावंत यांची कन्या निलप्रभा ही तीन भावंडातली सर्वात लहान बहीण. बालपणापासून वडिलांचे संस्कार झालेली निलप्रभा आमच्या वडिलांबरोबर 29 नोव्हेंबर 1993 रोजी विवाहबद्ध होऊन चव्हाण कुटुंबात आली.
माझे वडील मूळ कणगल्याजवळील हिटणी गावचे. त्यांचेही वडील म्हणजे आमचे आजोबा हे तिथले सरपंच होते. त्यांनीही मुलांवर चांगले संस्कार केले होते. शिक्षणासाठी म्हणून माझे बाबा बेळगावात आले आणि बेळगाववासिय झाले.
शिक्षण करीत असतानाच वडिलांवरही सामाजिक कार्याचा पगडा होता त्यामुळे 1990 साली ते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तिकिटावर भाग्यनगर विभागातून महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले.
त्या अगोदर त्यांचे रेशन दुकान होते त्यामुळे त्यांचा जनसंपर्क चांगला होता. आपल्या पहिल्या नगरसेवक कार्यकाळात त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली आणि त्यामुळे पुन्हा 2007 साली झालेल्या निवडणुकीतही त्यांनी चांगले यश संपादन केले. त्या दरम्यान आमचा वार्ड महिला वार्ड झाला होता आणि म्हणून वडिलांनी आमच्या मम्मीला उभा करून 2001 साली नगरसेविका म्हणून निवडून आणले.
चार मातब्बर उमेदवार असूनही त्या1600 इतक्या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या. वडिलांचा अनुभव आणि केवळ दहावीचे शिक्षण असले तरीसुद्धा संस्कारक्षम असलेल्या आमच्या मम्मीने नगरसेवकांची मने जिंकली आणि त्या 2002 साली बेळगावच्या पहिल्या नागरिक म्हणजे महापौर झाल्या. 2002 ते 2003 या कालावधीत त्यांनी अनेक समाज उपयोगी कामे केली.
विशाल दृष्टिकोन असलेली आमची मम्मी महापौर असतानाच दक्षिण व उत्तर मधील पाच पाच वार्डामध्ये 24 तास पिण्याच्या पाण्याची सोय राबविण्यात आली.
सदाशिव नगरात उभारण्यात आलेल्या ज्योतिबा मंदिरासाठी आणि मराठा मंदिरासाठी अल्प किमतीत जागा मिळवून दिली. भाग्यनगरातील धनश्री गार्डन ही आमच्या मम्मी महापौर असताना केलेल्या कार्याची पावती आहे. चिदंबर नगर स्मशानात महादेव मंदिर बांधून त्याचे उद्घाटन ही त्यांनीच केले.
येणाऱ्या परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन त्यातून मार्ग कसा काढायचा याचे आकलन मम्मीला होते.
नीटनेटका संसार करणाऱ्या आमच्या मम्मीने महानगरपालिकेत आपल्या कार्याचा ठसा उमटविला. मासे बनविण्यात पारंगत असलेल्या आमच्या मातोश्री ह्या उत्तम स्वयंपाकी होत्या. घरी येणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक त्या आदरातिथ्य करायच्या.
सामाजिक कार्य करीत असतानाच त्यांनी आम्हा मुलांवर सुद्धा संस्काराचे बीज पेरले. त्यांच्या मार्गदर्शनातूनच आमची दीदी ऐश्वर्या हिने जैन इंजीनियरिंग कॉलेजमधून 2017 साली बी इ पूर्ण केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथील आर एम आय टी विद्यापीठातून मास्टर इन आय टी ही 2020 साली पदवी मिळवली.
ती आज मेलबर्न येथील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये आयटी कन्सल्टंट म्हणून काम पाहत आहे. तिच्या पावलावर पाऊल टाकून आमची दुसरी दीदी अक्षता हिने जीआयटी मधून 2023 ला कॉम्प्युटर सायन्स मधून बी ई पूर्ण केली असून तीनेही आता मास्टर्स इन डाटा हा कोर्स मेलबर्न येथील आर एम आय टी विद्यापीठातून अलीकडेच पूर्ण केला आहे. तेथे सध्या ती इंटरनशिप करीत आहे.
स्वतःच्या आरोग्याकडे पूर्णतः लक्ष देणाऱ्या आमच्या मम्मीने विविध कामासाठी येणाऱ्या सर्वांच्या अडी अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नव्हे तर त्या भांदूर गल्ली येथील अहिल्यादेवी महिला सहकारी सोसायटीच्या स्थापनेपासून म्हणजे गेल्या 30 वर्षापासून संचालिका असून आत्ताच त्या चेअरमन झाल्या आहेत. या संस्थेतून अनेकांना आणि खास करून महिलांना उभा करण्यास त्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.
मराठा समाज सुधारणा मंडळाच्या त्या आजीव सदस्या असून एक कर्तृत्ववान समाजसेविका म्हणूनच त्यांच्याकडे पहावे लागेल.
आपल्या आरोग्याकडे पूर्णतः लक्ष देणाऱ्या, रोज सकाळी फिरावयास जाणाऱ्या, मैत्रिणींना मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या मम्मी अशा अचानक इतक्या लवकर आम्हाला सोडून जातील असे आम्हाला ध्यानीमनी वाटले नव्हते. पण काळापुढे कुणाचेच काय चालत नाही हेच खरे.
त्यांच्या अचानक निघून जाण्याने आमच्या सर्वांच्या आयुष्यात कधीही भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
मम्मी महापौर होऊन 23 वर्षे लोटल्यानंतरही त्यांच्या निधनानंतर अनेक थोरामोठ्यांनी येऊन आमच्या घरी आमच्या पप्पांचे व आमचे सांत्वन करायचा प्रयत्न केला त्यावरून पप्पा मम्मी यांनी केलेल्या कार्याची आम्हास साक्ष पटली. त्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. स्वर्गीय मम्मीच्या आत्म्यास सद्गती लाभावी ही त्या परमेश्वराकडे प्रार्थना !
-स्वयम् संभाजी चव्हाण.


