बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील ईएसआय सेवेचा लाभ घेणाऱ्या शेकडो कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना सध्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून ईएसआय सुविधा असलेल्या एका चॅरिटेबल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाल्यावर, डिस्चार्ज देताना रुग्णांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे अनेक गरीब रुग्णांचे हाल होत असून, या गंभीर समस्येवर तातडीने लक्ष घालण्यासाठी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेतली.
येळ्ळूर रोड येथील केएलई चॅरिटेबल हॉस्पिटल मधील बंद करण्यात आलेली कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) योजना गोरगरिब लोकांची गरज लक्षात घेऊन त्यांच्या सोयीसाठी पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी ईएसआय धारक गरजू रुग्णांच्या कुटुंबीयांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.
हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या आणि डिस्चार्ज होत असलेल्या ईएसआय धारक गोरगरीब रुग्णांच्या कुटुंबीयांनी अनगोळचे माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली अलीकडेच उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत सदर मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करत आज जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा विनायक गुंजटकर आणि शिष्टमंडळासमवेत भेट घेऊन चर्चा केली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ईएसआय सेवेचे लाभार्थी असलेले अनेक चॅरिटेबल रुग्णालयात दाखल होत असून रुग्णालयातून डिस्चार्ज घेताना रुग्णांकडून पैशांची मागणी करण्यात येत आहे. बेळगावमधील एका चॅरिटेबल रुग्णालयात दुपारच्या सुमारास ईएसआय रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णांना के.एल.ई. रुग्णालयातून बाहेर काढल्याचा आरोपही पुढे आला असून दिवसभर मजुरी करून पोट भरणाऱ्या कामगार आणि कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालयाचे शुल्क भरणे अशक्य झाले आहे. त्यामुळे अशा अचानक आलेल्या आर्थिक भुर्दंडामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक गरीब रुग्णांना याची माहिती नसल्याने ते या फसवणुकीचे बळी ठरत आहेत.

या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी तात्काळ जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन निवेदन दिले. ईएसआय सुविधा इतर रुग्णालयातही सुरू करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, त्यांनी संबंधित ईएसआय अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. चॅरिटेबल रुग्णालयांना ईएसआयचे नियम लागू नाहीत. यामुळे योग्य माहिती घेऊनच उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व ईएसआय लाभार्थी रुग्णांना आवाहन केले आहे की, त्यांनी उपचार घेण्यापूर्वी रुग्णालयात ईएसआय सुविधा खरोखरच लागू आहे की नाही, याची योग्य माहिती घ्यावी. योग्य रुग्णालयातच दाखल होऊन उपचार घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या प्रकारामुळे ईएसआय सुविधांच्या अंमलबजावणीतील त्रुटी समोर आल्या असून इएसआय सुविधांचा लाभ घेणाऱ्या रुग्णांना चॅरिटेबल रुग्णालयात आता हि सुविधा उपलब्ध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी अभिषेक भोसले आदी उपस्थित होते




