बेळगाव लाईव्ह : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही केवळ एक सण नसून, ती महाराष्ट्रासह तमाम मराठी जनांसाठी अस्मितेचा, शौर्याचा आणि ऐतिहासिक सन्मानाचा उत्सव आहे. बेळगाव शहरात गेल्या १०६ वर्षांपासून शिवजयंती शिस्तबद्ध आणि दैदिप्यमान स्वरूपात साजरी केली जात आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून विशेषतः यंदा, या ऐतिहासिक उत्सवाच्या शिस्तीला आणि पावित्र्याला उपनगरांतील डीजे संस्कृतीने सुरुंग लावण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
बेळगाव शहरातील १८ गल्ल्यांसह शहापूर, वडगाव, अनगोळ यांचा समावेश आहे, त्या सर्व गल्ल्यांमध्ये परंपरेप्रमाणे शिवजयंती साजरी केली जाते. या गल्ल्यांमध्ये आजवर डीजेचा वापर कधीही झाला नाही. सजीव देखावे, पारंपरिक वाद्ये, मर्दानी खेळ, झांज पथक, ढोलताशा, लाठीमेळा, लेझीम, भजनी मंडळे आणि महाराजांच्या इतिहासावर आधारित प्रसंगांचे सादरीकरण हा या मिरवणुकीचा केंद्रबिंदू असतो. मात्र यंदा, उपनगरांतील १० ते १२ गल्ल्यांमधून आलेल्या मंडळांनी डीजे लावल्याने संपूर्ण चित्ररथ मिरवणुकीचा रसभंग झाला.
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या स्पष्ट आवाहनानंतरही काही मंडळांनी डीजेचा अट्टहास धरला. परिणामी, सजीव देखावे सादर करत असलेल्या इतर चित्ररथांना अडथळे निर्माण झाले. उच्च ध्वनिप्रदूषणामुळे प्रेक्षकांना देखावे नीट पाहता आले नाहीत, अनेक ठिकाणी सजीव देखाव्यांचे सादरीकरण थांबवावे लागले. शिवाय, कर्णकर्कश आवाजामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली.
बेळगाव शहर हे शिक्षण आणि रोजगारासाठी विविध प्रांतातील लोकांना आकर्षित करते. यामुळे येथील लोकवस्तीमध्ये विविध राज्यांतील नागरिकांचा समावेश वाढला आहे. यातूनच शिवजयंतीशी थेट संबंध नसलेले काही युवक, युवकिंनी उत्सवाच्या स्वरूपात विकृती निर्माण करण्याचा प्रकार सुरू केला आहे. हिडीस नृत्य, अश्लील हालचाली, व्यसनाधीन वृत्ती यामुळे बेळगावच्या सांस्कृतिक अधिष्ठानाला आणि शिवजयंतीच्या परंपरेला धक्का पोहचतो आहे.

विशेष म्हणजे, जे भाग कधीही शिवजयंतीत सहभागी होत नव्हते, जसे की टिळकवाडी, कॅम्प, भाग्यनगर, रामनगर, तिथून आलेली मंडळे डीजेसहित मिरवणुकीत दाखल होत आहेत. या मंडळांमुळे परंपरेला विकृत वळण मिळत आहे.
शिवजयंती मिरवणूक ही कोणत्याही एका समाजाची मिरवणूक नाही, ती बेळगावच्या सर्व समाजांचे योगदान असलेली संस्कृतीचा गौरव करणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे, मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ तसेच मराठा समाजातील वरिष्ठ नेतेमंडळींनी मिरवणुकीला शिस्त लावण्यासाठी आणि चित्ररथ मिरवणुकीची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी आता पुढाकार घ्यायला हवा.
सध्या केवळ आवाहन करून जबाबदारी पार पाडली जाते, मात्र ते अपुरे आहे. डीजे, डॉल्बी आणि अश्लाघ्य वर्तन करणाऱ्या मंडळांवर थेट कारवाई करण्यासाठी प्रशासनाला सूचित करणं, नियमावली ठरवणं, आणि पालकत्व भूमिका घेणं, हे या नेत्यांचे कर्तव्य ठरते.
बेळगावमध्ये दरवर्षी १२ ते १४ तासांची चित्ररथ मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक म्हणजे शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास सजीव करण्याची प्रक्रिया आहे. गोवा, महाराष्ट्र, सीमाभागातील हजारो शिवप्रेमी या मिरवणुकीसाठी येतात. महिनाभर तयारी करून चित्ररथ सादर केले जातात. मात्र अशा हिडीस, डीजेप्रचुर मिरवणुकीमुळे या संपूर्ण परंपरेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे, आजच काटेकोर नियमावली आखली नाही, तर बेळगावच्या शिवजयंतीची ओळखच धूसर होण्याचा धोका दिसून येत आहे. बेळगावच्या शिवजयंती उत्सवाला केवळ शतकोत्तर परंपरा नाही, तर तो शिवकालीन संस्कृतीचा आधुनिक काळातील प्रतिबिंब आहे. त्यामुळे याचे जतन करणे, त्यास आलेल्या अपप्रवृत्तींवर आळा घालणे, आणि पुढील पिढीपर्यंत हे वैभव अबाधित ठेवणे, ही मध्यवर्ती शिवजयंती मंडळ, मराठा समाजाचे नेते, समाज संघटना आणि नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे.
शिवजयंती हा केवळ एक उत्सव नसून बेळगावच्या अस्मितेचा अभिमान आहे. मात्र डीजे संस्कृती, विकृत संगीत आणि बिनधास्त वर्तनामुळे या गौरवशाली परंपरेला गालबोट लागत आहे. त्यामुळे अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी शिस्त, संस्कार आणि सांस्कृतिक भान ठेवणं काळाची गरज ठरत आहे. हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव पुढील पिढ्यांपर्यंत टिकवायचं असेल, तर प्रत्येकाने जबाबदारीनं आणि समंजसपणानं पुढाकार घेणं आवश्यक आहे.