बेळगाव लाईव्ह : बेळगावातील कॅम्प धोबीघाट येथे नगर विकास प्राधिकरणाच्या 19 लाख रुपयांच्या अनुदानातून उभारण्यात येणाऱ्या उद्यानाचा भूमिपूजन समारंभ आज सोमवारी सकाळी उत्साहात पार पडला.
बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष एमएलआयआरसीचे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी उपस्थित होते. ब्रिगेडियर मुखर्जी यांच्या हस्ते विधिवत पूजा -आरती करून कुदळ मारण्याद्वारे विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी बेळगावच्या कॅम्प परिसरातील पाणी साठवणूक व हिरवळ अबाधित राखण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर मुखर्जी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बोर्डाचे माजी सदस्य विशेष स्वारस्य दाखवत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
तसेच या ठिकाणी आता एका चांगल्या उद्यानाची निर्मिती होणार असून त्यासाठी आम्ही नगर विकास प्राधिकरणाकडून 19 लाख रुपये मंजूर करून घेतले आहेत. हा प्रकल्प तात्काळ सुरू करून मान्सून समाप्त होण्यापूर्वी पूर्ण केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना धोबीघाट येथे दोन महिन्यापूर्वी पावसाच्या पाण्याची साठवणूक करण्याचा प्रकल्प भरून तो यशस्वी केला आहे. आता येथे दुसऱ्या टप्प्यातील विकास केला जाणार असून पर्यावरणीय उद्यानाची निर्मिती केली जाणार आहे.
हे उद्यान मॉर्निंग वॉकर्स, इव्हनिंग वॉकर्स आणि व्यायाम करणाऱ्या मंडळींसाठी उत्कृष्ट स्थळ असणार आहे असे सांगून माझी येथील रहिवाशांना एकच विनंती आहे की कॅन्टोन्मेंट परिसर तुमचा आहे. तो सुंदर ठेवणे हे जसे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कर्तव्य आहे तसे ते तुमचे देखील आहे हे लक्षात घ्या, असे नमूद केले.
याप्रसंगी नगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष शकील अहमद, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव कुमार, माजी उपाध्यक्ष साजीद शेख, अल्लेद किलमन, माजी सदस्या डॉ. राहिला शेख, रिजवान बेपारी यांच्यासह कंत्राटदार आणि इतर उपस्थित होते.




