बेळगाव लाईव्ह :कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्ध जातीयवादी टिप्पणी करणारे मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कुंवर विजय शाह यांची चौकशी व्हावी. तसेच त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई केली जावी, अशी मागणी कर्नाटक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बेळगाव शहर अल्पसंख्याक विभागाने केली असून तशा आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बेळगाव शहर अल्पसंख्याक विभागाच्यावतीने अध्यक्ष मन्सूरली एम. अत्तर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून ते केंद्र व राज्य सरकारकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.
मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कुंवर विजय शाह यांनी भारतीय सैन्यातील कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्ध केलेल्या गंभीर आक्षेपार्ह, बेजबाबदार आणि जातीयवादी वक्तव्याबद्दल तक्रार दाखल केली आहे.
एका प्रक्षोभक सार्वजनिक भाषणात मंत्री शाह यांनी कर्नल कुरेशी यांना ‘दहशतवाद्यांची बहीण’ असे संबोधत त्यांचा अपमानास्पद उल्लेख केला आहे. ही टिप्पणी केवळ तथ्यात्मकदृष्ट्या निराधार नाही तर जाणूनबुजून प्रक्षोभक आहे आणि सांप्रदायिक पूर्वग्रहात रुजलेली आहे.
कॅबिनेट दर्जाच्या सरकारी सेवकाकडून असे वक्तव्य केवळ नैतिकदृष्ट्या निंदनीय नाही तर असंतोष भडकावणारे आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणारे असल्यामुळे कायदेशीररित्या शिक्षापात्र आहे. अशा विधानांमुळे आमच्या सशस्त्र दलांचा अपमान होतो.
एकतेला आणि संवैधानिक मूल्यांना धक्का पोहोचतो. भारताची सेवा उत्कृष्टपणे करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी सन्मान आणि आदरास पात्र आहेत, त्यांची सेवा धार्मिकतेवर आधारित नाही.
कॅबिनेट मंत्री म्हणून शाह यांच्या शब्दांना महत्त्वपूर्ण वजन आहे. हे पद हे अधिकाराचे एक व्यासपीठ आहे आणि जातीय द्वेष पसरवण्यासाठी त्याचा गैरवापर करणे हे सार्वजनिक विश्वासाचे आणि पदाचे उल्लंघन आहे. तरी या घटनेची औपचारिक चौकशी सुरू करावी आणि संबंधित न्यायिक आणि कार्यकारी अधिकाऱ्यांकडे भारतीय दंड संहितेच्या कलम 153ए, 295ए आणि 505 अन्वये फौजदारी तक्रार दाखल करावी.
या तक्रारीची आणि केलेल्या कारवाईची प्रत माननीय राज्यपाल आणि अल्पसंख्याकांच्या राष्ट्रीय समितीला पाठवावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बेळगाव शहर अल्पसंख्याक विभागाचे अन्य पदाधिकारी व बरेच सदस्य उपस्थित होते.