बेळगाव लाईव्ह : मार्च २०२५ या कालावधीत बेळगाव विमानतळावरून होणाऱ्या प्रवासाच्या आकडेवारीवरून दिल्ली व बंगळुरू या मार्गांनी सर्वाधिक प्रवासी वाहतूक झाली असल्याचे दिसून आले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) ताज्या अहवालानुसार, पाच प्रमुख शहरांच्या प्रवासी व मालवाहतूक तपशीलावरून बेळगावची वाढती कनेक्टिव्हिटी स्पष्ट होते. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या मार्च २०२५ च्या अहवालानुसार बेळगाव विमानतळाची दिल्ली व बंगळुरू मार्गांवरील प्रवासी वाहतूक सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिल्ली मार्गावर सर्वाधिक प्रवासी वाहतूक झाली असून एकूण ८,७७६ प्रवाशांनी दिल्ली-बेळगाव मार्गाचा वापर केला आहे. यामध्ये ४,२३२ प्रवासी दिल्लीकडे गेले तर ४,५४४ प्रवासी दिल्लीहून बेळगावकडे परतले. मालवाहतुकीच्यादृष्टीनेही दिल्ली रूट आघाडीवर आहे. दिल्लीहून ०.९८ टन माल पाठवण्यात आला, तर फक्त ०.१४ टन माल बेळगावहून गेला आहे. त्यामुळे दिल्लीचा प्रशासन, शिक्षण आणि व्यावसायिकदृष्ट्या मोठा प्रभाव जाणवतो.
बंगळुरू मार्गावर एकूण ७,८१६ प्रवाशांची नोंद या मार्गावर झाली असून त्यामध्ये ३,९९६ प्रवासी बंगळुरूकडे गेले तर ३,८२० प्रवासी परतले. मालवाहतुकीसाठी दोन्ही दिशांनी ०.०५ टन माल हलवण्यात आला. परंतु, या यादीत सर्वाधिक मेल (०.०४ टन) बंगळुरूकडे पाठवण्यात आला. हा मार्ग कर्नाटकमधील दोन प्रमुख शहरांना जोडत असल्याने व्यवसायिक व कौटुंबिक कारणांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
हैदराबाद मार्गावर संतुलित वाहतूक नोंद झाली असून या मार्गावर ४,०५६ प्रवाशांनी प्रवास केला असून त्यात २,०१५ प्रवासी गेले आणि २,०४१ प्रवासी परतले. मालवाहतूक अत्यल्प (०.०१ टन) आहे. शिक्षण व आरोग्यसेवेसाठी या मार्गाचा वापर असावा असे संकेत मिळतात. मुंबई मार्गावर हळूहळू वाढत असलेला प्रवास लक्षात घेता मुंबईकडे १,१८० प्रवासी गेले आणि १,२५२ परतले, एकूण प्रवाशांची संख्या २,४३२ आहे. मात्र, या मार्गावर कुठलाही माल किंवा मेल हलवले गेले नाही, यावरून वैयक्तिक प्रवासाचे प्रमाण अधिक आहे असे दिसते.
जयपूर मार्गाचा मर्यादित वापर झाला असून फक्त १,१७५ प्रवाशांनी या मार्गाचा वापर केला असून त्यामध्ये प्रवासी संख्या जवळपास सम आहे. ना मालवाहतूक ना मेल त्यामुळे हा मार्ग पर्यटन किंवा खास क्षेत्रीय गरजांसाठीच वापरण्यात येत असावा असे दिसून येत आहे. प्रवासी संख्येनुसार बेळगाव – दिल्ली : ८,७७६, बेळगाव – बंगळुरू : ७,८१६, बेळगाव – हैदराबाद : ४,०५६, बेळगाव – मुंबई : २,४३२, बेळगाव – जयपूर : १,१७५ इतकी प्रवाशांची संख्या नोंद झाली आहे.