बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रातील महत्त्वाच्या मंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा सुरू केला आहे. बेळगाव शहरासह संपूर्ण जिल्हा सुंदर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून यासाठी क्रेडाईचे सहकार्य आवश्यक आहे. आपण एकत्रित येऊन काम केल्यास विकासाचा वेग आणखी वाढवता येईल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी केले.
क्रेडाई बेळगावची मासिक सभा गेल्या शनिवारी काकती येथील हॉटेल मॅरिएट येथे संघटनेचे अध्यक्ष युवराज हुलजी यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने खासदार शेट्टर बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सचिन कळ्ळीमणी, सुधीर पाणारे व आनंद कुलकर्णी उपस्थित होते.
प्रारंभी क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी यांनी पाहुण्यांसह उपस्थित आमचे स्वागत करून विषय पत्रिकेवरील विषयांची माहिती देताना हालगा एसटीपीचे काम 2016 पासून अर्धवट स्थितीत आहे. तो प्रकल्प पूर्ण करण्याबरोबरच रिंग रोड देखील लवकरात लवकर पूर्ण करावा. बेळगाव -धारवाड रेल्वे मार्गाचे काम गतीने करावे. बेळगाव विमानतळाचा विकास करावा, आदी मागण्या खासदारांसमोर मांडल्या केल्या.

खासदार जगदीश शेट्टर म्हणाले, बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी माझे केंद्रात प्रयत्न सुरू आहेत. बेंगलोर -बेळगाव वंदे भारत रेल्वे करिता प्रयत्न केल्यामुळे या रेल्वेला आता हिरवा कंदील मिळाला आहे. बेळगाव -धारवाड या रेल्वे मार्गाची अनेक वर्षापासून मागणी आहे. दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांनी देखील यासाठी प्रयत्न केले.
यासंबंधी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. वंदे भारत रेल्वेसह बेळगाव -रायचूर राष्ट्रीय महामार्ग व शहरातून गेलेल्या रेल्वे मार्गाचा विकास केला आहे. आपण एकत्रित येऊन काम केल्यास विकासात अजून वाढ होईल. हालगा येथील एसटीपी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. बेळगावकरांना लवकरात लवकर 24 तास पाणीपुरवठा व्हावा यासाठी हालचाली सुरू आहेत.
बळ्ळारी नाल्याचा देखील विकास केला जाणार आहे चोरला बेळगाव रस्त्यासाठी देखील पाठपुरावा सुरू आहे यल्लमा देवस्थानाला जाणाऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन लोकापूर रामदुर्ग सौंदत्ती धारवाड या मार्गावर नवीन रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे सांगून बेळगाव आतून जास्तीत जास्त विमान सेवेसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली.
मासिक सभेचे औचित्य साधून क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष झाल्याबद्दल युवराज हुलजी यांचा जिंदाल स्टील वर्क्सचे बेळगाव जिल्हा वितरक सुभाष गुळशेट्टी आणि व्यवस्थापक तथा उत्तर कर्नाटक प्रमुख अंकित अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे क्रेडाई संघटनेच्या राज्य संयुक्त सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल पंचाक्षरी हिरेमठ, महिला विंगच्या सहसमन्वयक म्हणून निवड झाल्याबद्दल करून करुणा हिरेमठ, क्रेडाई कर्नाटक राज्य महिला विंगच्या अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल दीपा वांडकर आणि चॅप्टर एक्सपान्शन कमिटी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल राजेंद्र मुतगेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सभेला चैतन्य कुलकर्णी, राजेश हेडा, संजीव कत्तीशेट्टी, सिद्धाप्पा पुजारी, रमेश तुपची, कुलदीप हंगिरगेकर, क्वेस नुरानी वगैरे क्रेडाई बेळगावचे सर्व सदस्य उपस्थित होते.




